कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियममध्ये दिग्गज फुटबॉलपटू लियोनल मेसी यांच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या गैरव्यवस्थापनप्रकरणी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्यासह दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगाल सरकारने बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसला गुरुवारी उत्तर दिले.
राज्याचे डीजीपी राजीव कुमार, बिधाननगरचे पोलीस आयुक्त मुकेश कुमार आणि क्रीडा मंत्रालयाचे मुख्य सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी २४ तासांच्या मुदतीत आपले स्पष्टीकरण सादर केले.
निवृत्त न्यायमूर्ती असीम कुमार रॉय यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने १३ डिसेंबर रोजी झालेल्या मेसी कार्यक्रमादरम्यान समन्वयाचा अभाव आणि प्रशासकीय अपयश आढळल्याने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, त्यांच्या उत्तरातील तपशील तत्काळ उपलब्ध होऊ शकले नाहीत.
समितीच्या निष्कर्षांच्या आधारे राज्य सरकारने अनेक आयपीएस व सरकारी अधिकाऱ्यांविरोधात प्रशासकीय कारवाई सुरू केली आहे. डीजीपी राजीव कुमार आणि मुकेश कुमार यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून, युवा भारती क्रीडांगणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला पदावरून हटवण्यात आले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे.
याशिवाय, बिधाननगरचे पोलीस उपायुक्त अनीश कुमार यांना निलंबित करण्यात आले असून, कार्यक्रमाच्या दिवशी कर्तव्यात कथित दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सूत्रांनुसार, क्रीडा विभागाच्या सचिवांनी सांगितले की कार्यक्रम ज्या पद्धतीने आयोजित होणार असल्याचे सांगितले होते, तसा झाला नाही. आयोजकांनी कार्यक्रमाच्या दिवशी पूर्वनियोजित आराखड्यात बदल केला होता. राजीव कुमार आणि मुकेश कुमार यांची लेखी उत्तरे तत्काळ उपलब्ध नव्हती.
१३ डिसेंबर रोजी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच साल्ट लेक स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. मेसींची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. मेसी मैदानात येताच गर्दी त्यांच्या दिशेने सरकली. कडक सुरक्षेअंतीही अनेकांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला.
प्रेक्षकांना मेसी नीट दिसत नसल्याने परिस्थिती लवकरच गोंधळाची बनली. मेसी अवघ्या २२ मिनिटे मैदानात थांबून निघून गेल्यानंतर संतप्त प्रेक्षकांनी तोडफोड सुरू केली. खुर्च्या आणि बाटल्या मैदानात फेकण्यात आल्या. अनेकांनी गेट तोडून मैदानात प्रवेश केला, तर स्टेडियमच्या गॅलरी आणि स्वच्छतागृहांचेही नुकसान झाले.
या घटनेनंतर राज्य सरकारने चौकशी समिती स्थापन केली आणि कार्यक्रमाचे आयोजक सताद्रु दत्ता यांना अटक केली. या प्रकरणामुळे राज्याचे क्रीडा मंत्री अरूप बिस्वास यांनी राजीनामा दिला.







