अर्जेन्टिनाचा महान फुटबॉलर लिओनेल मेस्सी याच्या ७० फूट उंचीच्या भव्य प्रतिमेचे वर्च्युअल अनावरण आज करण्यात आले. कोलकात्यातील बिग बेन आणि डिएगो माराडोना यांच्या प्रतिमेजवळ ही भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे. या अनावरणावेळी प्रतिमेसमोर फॅन्सची जबरदस्त गर्दी उसळली होती. संपूर्ण परिसरात “Messi! Messi!” अशा घोषणा घुमत होत्या.
याचदरम्यान मेस्सीने बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांचीही विशेष भेट घेतली.
यापूर्वी मेस्सी आज पहाटे सुमारे ३ वाजता कोलकाता विमानतळावर दाखल झाले. त्या वेळी विमानतळापासून हयात रीजेंसी हॉटेलपर्यंत दोन्ही बाजूंना हजारो फॅन्स त्यांच्या एका झलकसाठी रांगेत उभे होते. कडक बंदोबस्तात मेस्सीला हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्यांच्यासाठी रूम नंबर 730 राखीव ठेवण्यात आला असून सुरक्षा कारणास्तव संपूर्ण सातवा मजला बंद ठेवण्यात आला आहे.
मेस्सीचा पुढील कार्यक्रम कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये मैत्रीपूर्ण सामना खेळण्याचा आहे. त्यानंतर ते बंगालच्या संतोष ट्रॉफी संघाला सन्मानित करणार आहेत. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली आणि टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यासोबतही त्यांची भेट होणार आहे.
कोलकात्यानंतर मेस्सी हैदराबादकडे रवाना होतील. तेथे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये प्रदर्शनी सामना आयोजित आहे, ज्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी देखील सहभागी होणार आहेत. याचबरोबर राहुल गांधी यांच्याशीही मेस्सीची भेट ठरलेली आहे. सायंकाळी मेस्सीच्या सन्मानार्थ संगीताचा विशेष कार्यक्रम होणार आहे.
१४ डिसेंबरला मेस्सी मुंबईत असतील. सीसीआय येथे पॅडल कप सेशन, सेलिब्रिटी सामना आणि वानखेडे स्टेडियममध्ये एक मोठा कार्यक्रम अशी त्यांची व्यस्त शेड्यूल आहे. रात्री चॅरिटी फॅशन शो, तसेच सुआरेज आणि डी पॉलचे स्पॅनिश म्युझिक परफॉर्मन्स आयोजित आहे.
या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात १५ डिसेंबरला मेस्सी दिल्लीत येतील, जिथे अरुण जेटली स्टेडियममधील एका खास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्याशी भेट होईल.
सर्व चार शहरांत मेस्सीसोबत Meet and Greet कार्यक्रम ठेवण्यात आले असून फॅन्ससाठी १०० विशेष जागा राखीव आहेत. १० लाख रुपये शुल्क भरून फॅन्स मेस्सीसोबत सेल्फी घेऊ शकतात.







