नाटक, मराठी मालिका, वेबसीरिजमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठेचे शनिवारी अकाली निधन झाले. ती अवघ्या ३८ वर्षांची होती. दुर्धर आजाराने ती गेले अनेक दिवस आजारी होती. पण त्यातून ती सावरू शकली नाही. अखेर तिची प्राणज्योत मालवली. तिच्या या अकाली जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
प्रिया मराठेला कर्करोग झाला होता. त्यातून ती बरीही झाल्याचे सांगण्यात येत होते. पण पुन्हा एकदा या रोगाने उचल खाल्ली आणि त्यातून मग प्रिया सावरू शकली नाही. कर्करोगातून बरे झाल्यावर तिने परदेशात एका नाटकाचा दौरा केला होता. मात्र पुन्हा कर्करोगाने डोके वर काढले. यावेळी तिचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते.
प्रिया मराठेचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी ठाण्यात झाला. मराठी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या घरात त्यांचे बालपण घडले. प्रियाला महाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि नंतर तिने अभिनयाचे क्षेत्रातच कारकीर्द करण्याचे ठरविले.
या सुखांनो या, चार दिवस सासूचे, तू तिथे मी मधून उमटवला ठसा
२००५मध्ये ‘या सुखांनो या’ या मराठी मालिकेमधून प्रिया मराठे हिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथे मी’, आणि ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या. एक वेगळा प्रेक्षकवर्गही तिने निर्माण केला.
हिंदी मालिकांमध्येही तिने ठसा उमटविणाऱ्या भूमिका केल्या. ‘कसम से’ या मालिकेतील ‘विद्या बाली’, ‘पवित्र रिश्ता’मध्ये ‘वर्षा’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं’मध्ये ‘ज्योती माल्होत्रा’ या भूमिकांनी ती घराघरात पोहोचली. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील सहकलाकार सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर प्रियाची भावनिक पोस्ट प्रकाशित झाली होती.
हे ही वाचा:
भाजप राष्ट्रहितासाठी काम करते आणि त्यासाठी बलिदान देते
पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार
एअर इंडियाचं विमान बिघाडामुळे दिल्लीला परतलं
किम जोंग-उन याची चीनच्या बहुपक्षीय मंचावर उपस्थिती
‘साथ निभाना साथिया’ मालिकेत त्यांनी ‘भावनी राठोड’ ही नकारात्मक भूमिका साकारली तर मराठी इतिहासावर आधारित ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत त्यांनी ‘गोदावरी’ची भूमिका अतिशय समरसून साकारली. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील ‘मोनिका’ ह्या भूमिकेने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवली.
प्रिया मराठे यांनी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी 24 एप्रिल 2012 रोजी विवाह केला. त्यांनीही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रियाला बॅडमिंटन, प्रवास आणि वाचनाची विशेष आवड होती. पिझ्झा, पास्ता आणि पुरणपोळी हे तिचे आवडते पदार्थ होते. त्याचबरोबर ती अध्यात्मिकतेतही आस्था ठेवायची. प्रिया मराठे यांचा अभिनय प्रवास हा मराठी व हिंदी मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाचा ठरलेला आहे.







