कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियममध्ये अर्जेंटिनाचा फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेसी याच्याशी संबंधित कार्यक्रमादरम्यान झालेल्या अव्यवस्थेची नैतिक जबाबदारी स्वीकारत पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री अरूप बिस्वास यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा राजीनामा स्वीकारला असून, पुढील काळात क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी त्या स्वतः सांभाळणार आहेत.
आपल्या राजीनाम्यात अरूप बिस्वास यांनी नमूद केले आहे की, या घटनेच्या चौकशीसाठी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी निष्पक्षपणे व्हावी, यासाठी आपण क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा स्वीकारताना पत्रात लिहिले आहे की, “१३ डिसेंबर २०२५ रोजी विवेकानंद युवा भारती क्रीडांगणात घडलेल्या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी क्रीडामंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत क्रीडा विभागाची जबाबदारी मी स्वतः सांभाळेन.”
अरूप बिस्वास हे राज्याचे ऊर्जा मंत्रीही आहेत. त्यामुळे क्रीडामंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही ते राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत.
गेल्या आठवड्यात साल्ट लेक स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. यानंतर अरूप बिस्वास यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत होती.
उल्लेखनीय बाब म्हणजे, मेसीशी संबंधित या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांमध्ये मोठी अव्यवस्था निर्माण झाली होती. संतप्त चाहत्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. कार्यक्रमावेळी अरूप बिस्वास स्वतः मेसीसोबत स्टेडियममध्ये उपस्थित होते.
अनेक प्रेक्षक आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, बिस्वास आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मैदानात मेसीभोवती गर्दी केल्यामुळे, महागड्या तिकिटांची खरेदी केलेल्या चाहत्यांना फुटबॉल स्टारची झलकही पाहता आली नाही. या आरोपांमुळे हा कार्यक्रम राजकीय वादाचा विषय ठरला असून, विरोधकांनी राज्य सरकारवर गैरव्यवस्थापन आणि पक्षपाताचे आरोप केले आहेत.







