मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज ठाकरे यांच्या समर्थकांकडून अमराठी भाषिकांना मारहाण करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) संबंधित आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. मनसेचे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याने दारूच्या नशेत प्रसिद्ध इन्फ्लुएंसर राजश्री मोरे यांच्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले असून, मनसे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या प्रकरणावर पक्षाकडून स्पष्टीकरण देणारं पत्रही प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल शेख याने राजश्री मोरे यांच्याशी गैरवर्तन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी एक पत्र जारी करत सांगितले की, “जावेद शेख आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, मात्र त्यांच्या मुलाने केलेल्या कृत्याशी आमचा पक्ष कोणत्याही प्रकारे संबंधित नाही. आम्ही या प्रकाराचा तीव्र निषेध करतो आणि अशा वर्तनाचे समर्थन करत नाही. अविनाश जाधव यांनी पोलिसांना विनंती केली आहे की, संबंधित व्यक्तीवर कायदेशीर आणि योग्य ती कारवाई करावी. याप्रकरणी मुंबईच्या अंबोली पोलीस स्टेशनमध्ये राहिल शेखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गाडी चालवत होता, आणि ती गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी राहिल शेखला अटकही केली होती, मात्र नंतर त्याला नोटीस देऊन सोडण्यात आले.
हेही वाचा..
ब्रिक्स अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी भारत सज्ज
दिल्ली: कावड यात्रेदरम्यान मांस दुकाने राहतील बंद!
गोपाळ खेमका हत्या प्रकरण: आरोपी चकमकीत ठार!
भाषेच्या वादावरून मीरा भाईंदरमध्ये गोंधळ, मनसे कार्यकर्ते ताब्यात!
या प्रकरणावरून शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मनसे नेत्याच्या मुलाने राजश्री मोरे यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ रीपोस्ट केला. आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, “मराठी मुलगी राजश्री मोरे हिला मनसे नेत्याच्या मुलगा राहिल शेख याने शिवीगाळ केली. हे लोक फक्त हिंदूंनाच का मारतात? भिंडी बाजारमध्ये जायची हिंमत आहे का?” या प्रकरणामुळे मराठी अस्मिता, महिला सुरक्षितता आणि मनसेच्या भूमिकेबाबत नव्याने चर्चेला उधाण आलं आहे.







