सोमवारी (११ ऑगस्ट) उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये हिंदू संघटनेच्या सदस्यांनी एका थडग्याची तोडफोड केली आणि दावा केला की ही रचना मंदिरावर बांधली गेली आहे. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आणि पीएसी सैन्य तैनात केले आहे आणि वादग्रस्त जागेभोवती बॅरिकेड्स उभारले आहेत. बजरंग दल आणि हिंदू संघटनांचा दावा केला आहे कि हे थडगे नसून भगवान शिव आणि श्रीकृष्ण यांचे मंदिर आहे.
तहसीलच्या रेडिया परिसरातील अबू नगर येथे असलेल्या या वास्तूवरून हा वाद सुरु आहे. नवाब अब्दुल समदची ही कबर भगवान कृष्णाचे २०० वर्षे जुने मंदिर असल्याचा दावा बजरंग दल आणि भाजप जिल्हाध्यक्षांसह विश्व हिंदू परिषदेने केला होता. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी येथे पूजापाठ करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळपासूनच येथे मोठ्या संख्येने हिंदू संघटनांचे कार्यकर्ते जमू लागले. घटनास्थळावरील एका व्हिडिओमध्ये भगवे झेंडे घेऊन थडग्याभोवती ‘जय श्री राम’चा जयघोष करणारे अनेक लोक दिसले.
हिंदू संघटनेच्या सदस्यांनी कबरीच्या परिसरात प्रवेश केला आणि कबरीच्या बाहेरील भागात तोडफोड केली. हिंदू संघटनांनी येथे पूजा करण्याची मागणी केली. बजरंग दलाचे सह-संयोजक धर्मेंद्र सिंह म्हणाले की, प्रशासन आम्हाला रोखू शकणार नाही. पूजा करणे हा आमचा अधिकार आहे. आम्ही हिंदू धर्मात जन्माला आलो आहोत, पूजा करण्याचा अधिकार घेऊन जन्माला आलो आहोत. ते आमचे मंदिर आहे. त्या मंदिराला कबर म्हणणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी ही गर्दी जमली आहे.
विश्व हिंदू परिषदेचे (VHP) राज्य उपाध्यक्ष वीरेंद्र पांडे यांनीही हे ठिकाण भगवान भोलेनाथ आणि श्रीकृष्णाचे मंदिर असल्याचा दावा केला. “ही रचना थडगे नाही. तिथे धार्मिक चिन्हे, परिक्रमा मार्ग आणि मंदिराची विहीर आहे. १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जन्माष्टमी उत्सवासाठी ते स्वच्छ करावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही दहा दिवसांपूर्वी प्रशासनाला कळवले होते, परंतु ते ते गांभीर्याने घेत नाहीत,” असे पांडे म्हणाले.
हे ही वाचा :
मुंबईत उद्यापासून आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलंपियाड
खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचा निर्णय बँकांचा
आठवीच्या विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेतले!
राज यांच्या विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी नाकारली
दरम्यान, जिल्हाधिकारी रवींद्र सिंह यांनी सांगितले की, “दोनही बाजूंना समजावून सांगितले, परिस्थिती नियंत्रणात आहे”. फतेहपूरचे एसपी अनुप कुमार सिंह हे म्हणाले, आता परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. येथे १० पोलिस ठाण्यांमधील पथकं तैनात करण्यात आली आहेत. एक PAC कंपनी (प्रांतीय सशस्त्र दल) आणि स्थानिक प्रशासनही घटनास्थळी उपस्थित आहे. प्रशासन आणि पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून परिसरात शांतता आणि नियंत्रण राखले आहे.







