डॉ. दीपक शिकारपूर
१० जुलैला गुरुपौर्णिमा आहे. माझ्या आयुष्यात अनेक व्यक्तींनी योगदान दिले व प्रभाव पाडला. पण विशेष उल्लेख करायचा झाला तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर व डॉ विजय भटकरांचा.
ऐशीच्या दशकात मी टाटा मोटर्स (तेंव्हाचे टेल्को) इथे करिअर सुरु केलं . संगणक उद्योग तेव्हा बाल्यावस्थेत होता. काही वर्षात मी कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा सभासद झालो व तांत्रिक परिषदांमध्ये सहभागी व्हायला लागलो. तेव्हा मी प्रथम सीडॅक ह्या संस्थेबद्दल ऐकले होते. नंतर काही वर्षात परमसुपर कॉम्युटरचा बोलबाला झाला. डॉ विजय भटकर हे नाव त्यामुळे सर्वतोमुखी झाले. भारताच्या आयटी उद्योगाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. १९८०च्या दशकात हवामानाच्या अंदाजाची अचूकता वाढवण्यासाठी भारताला महासंगणकाची गरज होती. परंतु त्यासाठी क्रे कंपनीचा महासंगणक आपल्याला विकण्याचे अमेरिकेने नाकारले. त्यावर तोडगा म्हणून भारताने महासंगणकाचे तंत्रज्ञान विकसित करायला हवे, असे मत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी शास्त्रज्ञांसमोर मांडले.
ह्या प्रकल्पाची कार्यवाही भटकर यांच्यावर सोपवण्यात आली. १९८७ सालच्या डिसेंबर महिन्यात महासंगणक बनविण्याच्या कामाचा आराखडा तयार झाला. लगेचच यासाठी एका संस्थेची स्थापना झाली. ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्यूटिंग’ (सी-डॅक) या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. तो दिवस होता १९८८ सालचा गुढीपाडवा. जुलै १९८८ मध्ये ‘सी डॅक’ने ‘परम महासंगणका’चे आपले पहिले लक्ष्य निश्चित केले. हे लक्ष्य जुलै १९९१पर्यंत पार करायचे होते. त्यासाठी ३७.५ कोटी रुपयांची तरतूद होती. विशेष म्हणजे, पहिला ‘परम महासंगणक’ सी-डॅकने ३० कोटी रुपयांपेक्षाही कमी खर्चात तयार केला. १५ ऑगस्ट १९९१ या दिवशी ‘परम – ८०००’ तयार झाल्याची अधिकृत घोषणा केली गेली. त्यांना प्रथम मी विवेक सावंतांबरोबर भेटलो. त्यावेळी संगणक प्रशिक्षण देशभर प्रसार करायचा त्यांचा मानस होता.
हे ही वाचा:
बंदवर मुख्तार अब्बास नकवी काय म्हणाले ?
मॉलमध्ये काम करायचे असेल तर मुस्लिम हो, म्हणणाऱ्या फराझला अटक
हिंदू असल्याचे भासवून तो मैत्रिणीला हनुमान चालिसा म्हणून दाखवायचा, पण…
मैदानावरचा मराठा, जो भेदरला नाही, झुकलाही नाही!
माझा भटकर सरांशी स्नेह सुरु झाला तो महाराष्ट्र राज्य सरकारमुळे. २०१० मध्ये सरकारने इ गव्हर्नन्स समिती प्रस्थापित केली होती. त्याचे अध्यक्ष डॉ. भटकर सर होते व मी सदस्य होतो . त्याकाळी मंत्री, मुख्यमंत्री, सरकारी अधिकारी ह्यांच्या समवेत चर्चा करायची संधी अनेकदा मिळाली. हे सर्व सरांना किती मानतात हे अनुभवायला मिळाले. ग्रामीण भागात जन्म झाल्याने सरांना तळागाळातले प्रश्न माहित आहेत. इंटरनेट कशी क्रांती करू शकेल ह्याबद्दल त्यांचे विचार स्पष्ट आहेत. नंतर सलग चार वर्ष महाराष्ट्र राज्य आयटी पुरस्कार निवड समितीत मला त्यांच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. कुठल्या उद्योगांना पुरस्कृत करायचं ह्याबद्दल अनेक वेळा सरकारी अधिकाऱ्यांबद्दल मतभिन्नता होई. सरांच्या व्यक्तिमत्वामुळे दर वेळेला मार्ग निघत असे. फक्त नाव असलेल्या मोठ्या उद्योगांना पुरस्कार द्यायच्या ऐवजी भविष्यातील क्रांतिकारी तंत्र वापरणाऱ्या वा विकसित करणाऱ्यांना उमेदीच्या काळातच सरकारने प्रोत्साहित करायला हवे हा त्यांचा त्याकाळापासून विचार होता . त्याकाळी स्टार्टअप असे नाव प्रचलित नव्हते . पण अशा युवा नवउद्योजकांना पुढे आणायचे श्रेय डॉ. भटकर सरांना निःसंशय जाते. माझ्या अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली आहे व अनेकदा प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितही राहिले आहेत. ह्याबद्दल मी सरांचा वैयक्तिक आभारी आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गो. रा. परांजपे पुरस्कार (उत्कृष्ट विज्ञान शास्त्र लेखनासाठी) मला २०११ साली जाहीर झाला . कुणाच्या हस्ते समारंभ पूर्वक द्यायचा ह्याबद्दल साहित्य परिषदेत चर्चा झाली . सर्वानुमते प्रमुख पाहुणे म्हणून सरांचे नाव पुढे आले. माझ्या स्नेहापोटी डॉ भटकर सर त्या समारंभाला साहित्य परिषदेत आले व कार्यक्रम एका उंचीवर गेला.
डॉ. माशेलकरांना जग एक थोर शास्त्रज्ञ, विचारवंत म्हणून ओळखते. ५१ विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे व हा एक जागतिक विक्रमच आहे. माझ्या सारख्या सर्वसामान्य संगणक व्यावसायिकाला या थोर शास्त्रज्ञाचा जवळून सहवास कधी लाभेल असे जर कोणी सांगितले असते तर वीस वर्षापूर्वी मी त्याला वेड्यात काढले असते. रसायनशास्त्राचा काहीही संबंध नसल्याने ते दृष्टीक्षेपाच्याही पल्याडच होते. संगणकशास्त्रात थोडेफार लेखन केल्याने माझे थोडेफार नाव झाले होते. एका पुस्तकाच्या प्रकाशनाला माशेलकर सर आले. बहुदा त्यांना माझे लिखाण आवडले असावे. त्यांना मी लिहिलेली पुस्तके भेट दिली. नंतर कळले की सरांनी ती सर्व वाचली आहेत. नंतर पुणे व्यासपीठ, मराठा चेंबरच्या समारंभात त्यांची गाठभेट होत होती.
अचानक एकदा त्यांचा सुमारे २०११ च्या डिसेंबर ला फोन आला. पुण्यात आपण पुणे इंटरनेशनल सेंटर हे एक “थिंक टॅन्क ” म्हणजे विचार मंथन पीठ सुरु करीत आहोत व त्याच्या संस्थापक सदस्यात तू आलास तर मला आनंद होईल. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. नंतर मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यांनी मला कार्यक्रम समितीत समन्वयक म्हणून समावेश केला. नंतर दोन वर्षे अनेक भेटी गाठीतून एक व्यक्ती म्हणून त्यांना जवळून पाहता आले. आम्ही अनेक प्रकल्पांवर एकत्र काम केले. इ-वेस्ट व्यवस्थापनाच्या धोरणपत्रिका निर्मितीचा मी प्रमुख लेखक होतो. साधेपणा, मार्दवपूर्ण स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा, कुशाग्र बुद्धी, स्मरणशक्ती, वेळेने दिलेली पोच पावती अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. त्यांची अनेक भाषणे मी ऐकली आहेत व प्रत्येक वेळी काहीतरी नवीन विचार ते देत असतात.
८२व्या वयात उत्साह एखाद्या तरुणाला लाजवेल असा आहे. त्यांचा एक जानेवारीला वाढदिवस असतो . तो दिवस मी कधीच चुकवत नाही . सरांचे आशीर्वाद वर्षाच्या पहिल्या दिवशी ऊर्जा देऊन जातात (जी वर्षभर पुरते). हा पायंडा सात वर्षांपूर्वी १ जानेवारी २०१८ ला मोडणार असे वाटले, कारण त्याच दिवशी माझ्या मुलाचे लग्न ठरलं. त्याच दिवशी सरांचा पंचाहत्तरीचा सोहळा. मी सरांना विवाहाचे निमंत्रण दिले. ते येतील का नाही खात्री नव्हती कारण त्यांचा अमृतमहोत्सव. विवाह सोहळ्यात मी मंचावर उभा होतो आणि मला प्रेक्षागृहात लगबग दिसली. कुणीतरी सांगितलं माशेलकर सर आले आहेत. सुदाम्याच्या घरी पोहे खायला जेव्हा कृष्ण भगवान गेले होते तेव्हा सुदाम्याची जी मनस्थिती होती तीच माझी त्यावेळी होती. त्यांनी आम्हाला आशीर्वाद तर दिलेच पण अनेकांना त्यांच्याबरोबर फोटो पण काढू दिले. त्यांना लोकांकडून विशेषतः (युवा पिढीकडून) जे सेलेब्रिटी स्टेटस मिळते ते पाहून मला खूप आनंद होतो. समाज योग्य दिशेने चालला आहे ह्याची खात्री पटते. सरांची पुढची पिढी अमेय व सुशील पण कर्तृत्ववान आहेत व त्यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवतील ह्याची खात्री आहे . माझी परमेश्वराकडे एकच प्रार्थना आहे ” सरांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो” . जर पुनर्जन्म असेल तर पुढील जन्मी त्यांचा विद्यार्थी व्हायला नक्कीच आवडेल.
लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत







