नागपुरात झालेली कालची घटना ही सुनियोजित होती. पोलिसांवर हल्ला करण्यात आला, ट्रॉलीभर दगड सापडले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे देखील जप्त करण्यात आली. हल्लेखोरांना सोडणार नाही, सर्वांवर कारवाई करण्यात येईल. तसेच पोलिसांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, ज्यांनी हल्ला केला त्यांना काही झाले तरी सोडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील कालच्या घटनेचा घटनाक्रम सांगितला. यावेळी नागपुरासह राज्यातील सर्व जनतेला शांतता राखण्याचे आवाहनही केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपुरातील महाल परिसरात सकाळी ११.३० वाजता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘औरंगजेबाची कबर हटाव’ असे नारे देत आंदोलन केले. आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंड्या असलेली प्रतीकात्मक कबर जाळली. या प्रकरणी गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.
यानंतर सायंकाळी एक अशी अफवा पसरवली कि, जी प्रतीकात्मक कबर जाळली त्या कापडावर धार्मिक मजकूर होता. यानंतर अत्तर रोडमधील नमाज ऑटोकुल या ठिकाणी २०० ते २५० चा जमाव जमा झाला आणि नारे देवू लागला. ‘आग लावून टाकू’ असे हिंसक वक्तव्य करण्यात आले. यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर बळाचा वापर केला.
यापूर्वी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार द्यायची आहे अशी मागणी करण्यात आल्याने त्यांना गणेश पेठ पोलीस ठाण्यात आमंत्रित करण्यात आले. एकीकडे पोलिसांची कारवाई सुरु असताना दुसरीकडे अन्सापुरी भागात २०० ते ३०० लोक हातात काठ्या घेवून दगडफेक करू लागले, त्यांच्या तोंडावर फडके बांधले गेले होते. या घटनेत १२ दुचाकींचे नुकसान आणि काही लोकांवर धारधार शश्त्राने हल्ला करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
“नागपुरातील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट”
चेहरा झाकून हातात काठ्या, दगड घेऊन घडवली हिंसा; नागपूरमधील सीसीटीव्ही फुटेज समोर
छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह रील, दोन मुस्लीम तरुणांना अटक!
नागपूर हिंसाचार: पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत ८० जणांना घेतलं ताब्यात
ते पुढे म्हणाले, तिसरी घटना भालदारपुरा भागात सायंकाळी ७३० वाजता घडली, त्याठिकाणी ८०-९० लोकांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. या घटनेत १ क्रेन, दोन जेसीबी आणि काही चार चाकी वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेमध्ये ३३ पोलीस जखमी झाले, ज्यामध्ये तीन उपायुक्त दर्जाचे पोलीस आहेत. त्यातील एका उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. एकूण पाच नागरिक जखमी झाले आहेत, तिघांवर उपचार करून सोडले आहे तर एक आयसीयुमध्ये आहे.
या प्रकरणी गणेश पेठ पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत, तहसील पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे, असे एकूण पाच गुन्हे आहेत. ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एसआरपीएफच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
सकाळच्या घटनेनंतर पूर्णपणे शांतात होती. पण संध्याकाळी काही लोकांनी जाणीव पूर्वक हल्ला केल्याचे समोर दिसतंय. कारण की, जवळपास एक ट्रॉली भरून दगड त्या ठिकाणी मिळाले आहेत. काही लोकांनी वरती जमा करून ठेवलेले दगड देखील पहायला मिळाले. मोठ्या प्रमाणात असलेली शस्त्रे देखील जप्त करण्यात आलेली आहेत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हल्लेखोरांनी ठरवून काही घरांना, आस्थापनांना लक्ष केले. त्यामुळे हे सर्व सुनियोजित दिसत आहे. हल्लेखोरांवर कारवाई नक्की होईल आणि एक गोष्ट स्पष्ट म्हणजे, पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना काही झाले तरी सोडणार नाही. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे शांतात राखणे सर्वांची जबाबदारी आहे.
‘छावा’ चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणला. त्यानंतर राज्यातील लोकांच्या भावना देखील प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा मनातील राग बाहेर येत आहे. या सर्व गोष्टी असल्यातरी सर्वांनी सय्यम पाळला पाहिजे. जर कोणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्याची जात, धर्म न पाहता कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.







