पेपरफुटीनंतर आता नीट निकालात देखील मोठा गोंधळ!

गुणांतील तफावतीमुळे विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव घेण्याची तयारी

पेपरफुटीनंतर आता नीट निकालात देखील मोठा गोंधळ!

वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET-UG 2026 परीक्षा यंदा नव्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बीड जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांच्या निकालात गंभीर तफावत आढळल्याचा आरोप समोर आल्याने राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) पुन्हा एकदा प्रश्नांच्या केंद्रस्थानी आली आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तरपत्रिकेच्या (OMR) आधारे मोजले असता त्यांना ५०० हून अधिक गुण मिळत असल्याचे दिसते. मात्र अधिकृत स्कोअरकार्डमध्ये त्यापैकी एका विद्यार्थ्याला केवळ ९५ गुण दाखविण्यात आले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बीडच्या या विद्यार्थ्यासह वडवणीची ज्ञानेश्वरी पवार, पुण्याचा आर्यन चव्हाण यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत असाच धक्कादायक प्रकार हा घडला आहे.

बीडमधील संबंधित विद्यार्थ्यांनी एनटीएने उपलब्ध करून दिलेल्या उत्तरतालिकेच्या आधारे गुणांची पडताळणी केली. त्यानुसार एका विद्यार्थ्याला ५२२ गुण मिळत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर त्याच विद्यार्थ्याच्या स्कोअरकार्डमध्ये अवघे ९५ गुण नोंदविण्यात आल्याने सर्वांनाच धक्का बसला. एवढी मोठी तफावत कशी झाली, याबाबत विद्यार्थ्यांना कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण मिळालेले नाही.
हे ही वाचा:
अंडी-चिकन महागले; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका!

मोदींच्या आवाहनालाही छेद! सोन्याचे दर घसरताच खरेदी पुन्हा वाढली

‘विक्रम-1’ झेपावले; भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचे नवे पर्व

लॉर्ड्समधील सामना रोहितचा अखेरचा नाही!

या प्रकारामुळे केवळ एका विद्यार्थ्याचाच नव्हे, तर आणखी काही विद्यार्थ्यांच्या निकालांबाबतही शंका उपस्थित करण्यात येत आहे. पालकांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत एनटीएकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र अद्याप समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा असतो. अशा परिस्थितीत गुणांमध्ये इतकी मोठी तफावत आढळल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याची भावना पालक व्यक्त करत आहेत. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ होऊ नये, अशी मागणीही होत आहे.

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, जर उत्तरपत्रिका आणि अधिकृत स्कोअरकार्ड यामध्ये इतका मोठा फरक आढळत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर असून संपूर्ण निकाल प्रक्रियेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. एनटीएने संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका, स्कोअरकार्ड आणि मूल्यांकन प्रक्रिया पुन्हा तपासून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी निकाल प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. काहींनी याआधीही विविध स्पर्धा परीक्षांच्या निकालांबाबत वाद निर्माण झाल्याची आठवण करून देत एनटीएच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

या संपूर्ण प्रकरणात एनटीएकडून अधिकृत आणि सविस्तर स्पष्टीकरणाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र तोपर्यंत बीडमधील विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरूच राहणार असून, न्यायालयीन लढाईची शक्यताही अधिक बळावली आहे. नीटसारख्या देशातील सर्वात महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेच्या विश्वासार्हतेवर या प्रकरणामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणात सत्य समोर आणण्यासाठी तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

Exit mobile version