मोदी सरकारने दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना नववर्षाची मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रोच्या विस्ताराला मंजुरी दिली. ही माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रोच्या फेज ५ए अंतर्गत ३ नवे कॉरिडॉर मंजूर केले आहेत. यामध्ये १३ नवे मेट्रो स्थानके उभारण्यात येणार आहेत.
या तीन कॉरिडॉरमध्ये आर.के. आश्रम मार्ग ते इंद्रप्रस्थ (९.९१३ किमी), एअरोसिटी ते आयजीआय विमानतळ टी-१ (२.२६३ किमी) आणि तुघलकाबाद ते कालिंदी कुंज (३.९ किमी) यांचा समावेश आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी १६.०७६ किमी असून त्यामुळे राष्ट्रीय राजधानीतील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. दिल्ली मेट्रो फेज ५ए प्रकल्पाचा एकूण खर्च ₹१२,०१४.९१ कोटी असून याचा निधी केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून उभारला जाणार आहे.
हेही वाचा..
मुर्शिदाबाद दंगे : हत्याकांडातील १३ दोषींना जन्मठेप
राज–उद्धव युती : भावनांचा नाही, गरजांचा करार!
“जणू पुतिन झेलेन्स्कीच समोरासमोर…” ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला दिला बंगला भेट
सेंट्रल व्हिस्टा कॉरिडॉर सर्व कर्तव्य भवनांना जोडेल, ज्यामुळे या भागात कामासाठी जाणारे कर्मचारी आणि भेट देणाऱ्यांना मोठी सोय होईल. या कनेक्टिव्हिटीमुळे दररोज कार्यालयात जाणाऱ्या सुमारे ६०,००० लोकांना आणि सुमारे २,००,००० पर्यटकांना लाभ होईल. हे कॉरिडॉर प्रदूषण आणि जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून जीवनमान सुलभ करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर प्रतिक्रिया देताना अश्विनी वैष्णव म्हणाले, “केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रोच्या फेज ५ए ला मंजुरी दिली आहे. यामध्ये १३ नवी स्थानके असतील त्यापैकी १० भूमिगत आणि ३ उन्नत (एलिव्हेटेड) असतील. हा प्रकल्प सुमारे ३ वर्षांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.”
ते पुढे म्हणाले की, या अंतर्गत १६ किलोमीटर लांबीची नवी लाईन टाकली जाणार असून यासाठी ₹१२,०१५ कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे दिल्ली मेट्रोचे जाळे ४०० किमीपेक्षा अधिक होईल, ही स्वतःमध्येच मोठी उपलब्धी आहे. सध्या दिल्ली आणि एनसीआरमध्ये डीएमआरसीकडून सुमारे ३९५ किमी लांबीच्या १२ मेट्रो लाईन्स चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये २८९ स्थानके आहेत. आज दिल्ली मेट्रो हे भारतातील सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असून जगातीलही आघाडीच्या मेट्रो नेटवर्कपैकी एक आहे.







