न्यूझीलंड क्रिकेट संघ ने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात वेस्टइंडीज क्रिकेट संघ वर ३२३ धावांनी मोठा विजय मिळवला. बे ओव्हल, माउंट माउंगानुई येथे झालेल्या या सामन्यात किवी संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागांत वर्चस्व गाजवले.
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात संघाने ८ बाद ५७५ धावा करत डाव घोषित केला. कर्णधार टॉम लॅथम याने १३७ धावांची संयमी खेळी केली, तर सलामीवीर डेव्होन कॉनवे याने २२७ धावांची भव्य खेळी साकारत द्विशतक झळकावले. कॉनवेने या सामन्यात कसोटी कारकिर्दीतील नवा विक्रमही आपल्या नावावर केला.
उत्तरादाखल वेस्टइंडीजचा संघ पहिल्या डावात ४२० धावांवर बाद झाला. क्वेम हॉज याने शतक झळकावत लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाज अपयशी ठरले.
दुसऱ्या डावातही न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी वर्चस्व कायम ठेवले. संघाने २ बाद ३०६ धावा करत डाव घोषित केला. या डावात टॉम लॅथमने १०१ तर डेव्होन कॉनवेने १०० धावा करत शतक झळकावले आणि वेस्टइंडीजसमोर ४६२ धावांचे अवघड लक्ष्य उभे केले.
या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टइंडीजचा दुसरा डाव केवळ १३८ धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून जेकब डफी याने ४२ धावांत ५ बळी घेत निर्णायक भूमिका बजावली. अजाज पटेल यानेही ३२ षटकांत २१ मेडन टाकत २३ धावांत ३ बळी घेत उत्कृष्ट साथ दिली.
या सामन्याची खास बाब म्हणजे डेव्होन कॉनवेने एकाच कसोटीत द्विशतक आणि शतक अशी दुर्मिळ कामगिरी केली, तर टॉम लॅथमने दोन्ही डावांत शतके झळकावत कर्णधाराला साजेशी खेळी केली. डेव्होन कॉनवेला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने आपल्या नावावर केली. मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता, त्यानंतर किवी संघाने सलग दोन सामने जिंकत मालिका खिशात घातली. संपूर्ण मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी जेकब डफीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.







