भारताचे चांद्रयान-३ योग्य दिशेने मार्गक्रमणा करत असून त्याचा महत्त्वाचा टप्पा पुढील काही दिवसांत सुरू होणार आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथन यांनी सोमवारी दिली.
१४ जुलै रोजी चांद्रयान-३ प्रक्षेपित करण्यात आले होते. आताही चांद्रयान त्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार वाटचाल करत आहे. त्यामुळे २३ ऑगस्ट रोजी यशस्वीपणे चांद्रयानाचा रोव्हर हा भाग यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असा विश्वास सोमनाथन यांनी व्यक्त केला आहे. जेव्हा चांद्रयान चंद्राच्या १०० किमी गोलाकार कक्षेमध्ये भ्रमण करून चंद्राच्या जवळ जाऊ लागेल, तेव्हा या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा सुरू होईल.
येत्या काही दिवसांतच हा महत्त्वाचा टप्पा सुरू होत आहे. सध्या चांद्रयान चंद्राच्या अंडाकृती कक्षेमध्ये फिरत आहे. त्याचे चंद्रापासूनचे किमान अंतर १७० किमी तर कमाल अंतर ४३१३ किमी आहे. पुढील टप्प्यात ९ ते १७ ऑगस्टदरम्यान चंद्राला १०० किमी गोलाकार कक्षेमध्ये स्थानापन्न केले जाईल. त्यानंतर चांद्रयानातून विक्रम लँडरला चंद्रावर उतरवले जाईल. त्यामध्ये एक रोव्हर असेल, जो चंद्राच्या पृष्ठभागाचे विश्लेषण करेल. २३ ऑगस्टला रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
टेस्लाला प्राप्त होणार भारतीय ‘वैभव’
टोमॅटो भडकल्याने शाकाहारी थाळीच्या दरात २८ टक्के वाढ
भारतीय हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक
अविश्वास ठरावासाठी बीजेडीचा मोदी यांना पाठिंबा का?
लँडिंगसाठी लेजर किरणांची भूमिका महत्त्वपूर्ण
चांद्रयान-३मधील लँडरमध्ये लेजर डॉपलर आणि व्हेलोसिटी कॅमेरा बसवण्यात आला आहे. लेजर डॉपलर जमिनीवर उतरत असताना थ्रीडी लेजर किरणे फेकतात. ही जमिनीवर धडकून पुन्हा परततात आणि तेथील जमिनीचा उंचसखलपणा, ती ओबडधाबड आहे की नाही, याची सूचना देतात. या माहितीच्या आधारे चांद्रयान लँडिंगसाठी योग्य जागेची निवड करेल. त्याचवेळी व्हेलोसिटी कॅमेरा चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढेल आणि यानाच्या वेगाची माहिती देईल.







