केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी E२० पेट्रोलबद्दल समाजात पसरवण्यात येणाऱ्या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. सोबतच टीकाकारांना खुले आव्हान देत ते म्हणाले की, जर देशातील कोणत्याही वाहनाला २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे काही नुकसान झाले असेल तर त्याचे उदाहरण समोर आणले पाहिजे. शुक्रवारी (८ ऑगस्ट) बिझनेस टुडे इंडिया@१०० समिटच्या सत्राला संबोधित करताना गड़करीनी यांनी टीकाकारांना आव्हान दिले.
गडकरी म्हणाले, “२०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यामुळे देशातील एकाही कारला कोणतीही समस्या आली असेल तर त्याचे नाव सांगा. आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही.” या प्रकरणात चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना लक्ष्य करत ते म्हणाले की, काही लोक सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाविरुद्ध जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवत आहेत. या योजनेला सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) यांचा पाठिंबा आहे. यासोबतच, त्यांनी इथेनॉल वापरण्याचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे देखील अधोरेखित केले. “इथेनॉलमुळे केवळ कच्च्या तेलाच्या आयातीचे बिल कमी होणार नाही, तर शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवीन स्रोतही उपलब्ध होतील,” असे गडकरी म्हणाले.
यासोबतच शेतीव्यवसायला इथेनॉलमुळे होणाऱ्या फायद्यावर ते म्हणाले, पूर्वी मका उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १,२०० रुपये मिळत होते, परंतु आता इथेनॉल उत्पादनामुळे हा दर २,६०० रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास थेट मदत होत आहे. शेतीला ऊर्जा आणि वीजेकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे. टीकाकारांमागे काही स्वार्थ असू शकतात असेही गडकरी यांनी सूचित केले. ते म्हणाले, “काही लोकांचे स्वार्थ असू शकतात, परंतु आपल्याला त्यांची काळजी करण्याची गरज नाही. एआरएआय सारख्या संस्थांकडून त्याची चाचणी घेतल्यानंतरच मंत्रालय मानके ठरवते.” त्यांची प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे जेव्हा देशभरात २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E२०) च्या वापराचा वाहनांच्या कामगिरीवर होणाऱ्या परिणामांबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तथापि, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने अलीकडेच स्पष्टीकरण देत या शंका अवैज्ञानिक आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, E२० वर आधारित कार्बोरेटेड आणि इंधन-इंजेक्टेड वाहनांवर १ लाख किमी चाचणी घेण्यात आली आहे, ज्यामध्ये दर १०,००० किमीवर कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. पॉवर, टॉर्क आणि मायलेजमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण फरक आढळला नाही. जुन्या कारमध्येही, कोणताही असामान्य झीज किंवा खराबी आढळली नाही. E२० पेट्रोलने देखील कोल्ड आणि हॉट स्टार्ट चाचण्या यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या आहेत.
हे ही वाचा :
५०% टॅरिफचा ट्रंपबम? भारतासाठी तर तो ‘अब्बा-डब्बा-जब्बा’च!
अगस्ता घोटाळ्याचा बिचौलिया गजाआडच!
ऑपरेशन धराली: ३५७ नागरिकांचा जीव वाचवला, ८ जवान व सुमारे १०० नागरिक अद्याप बेपत्ता
याव्यतिरिक्त मंत्रालयाने कबूल केले की इथेनॉलच्या कमी ऊर्जा घनतेमुळे, मायलेजमध्ये १-२% (नवीन वाहनांमध्ये) आणि ३-६% (जुन्या वाहनांमध्ये) थोडीशी घट होऊ शकते. परंतु हा फरक तांत्रिकदृष्ट्या स्वीकार्य आहे आणि योग्य इंजिन ट्यूनिंगसह नियंत्रित केला जाऊ शकतो. जुन्या वाहनांमध्ये, २०-३० हजार किमी नंतर काही रबर भाग बदलावे लागू शकतात, जी एक सामान्य देखभाल प्रक्रिया आहे.
शासकीय आकडेवारीनुसार, २०१४-१५ पासून, इथेनॉल मिश्रणामुळे देशाचे परकीय चलन ₹१.४० लाख कोटी वाचले आहे आणि इथेनॉल खरेदीद्वारे शेतकऱ्यांना ₹१.२० लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. नीती आयोगानुसार, ऊसावर आधारित इथेनॉल ६५ टक्के आणि मक्यावर आधारित इथेनॉल ५० टक्के उत्सर्जन कमी करते.







