काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एपस्टिन फाइलपेक्षाही जास्त चर्चेत आले आहेत. कदाचित, एपस्टिन फाइलमधील सगळ्या गुप्त गोष्टी बाहेर येत असताना अमेरिकेतही पृथ्वीराज चव्हाण यांची चर्चा होत असेल. मध्यंतरी त्यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत काही दावे करून चर्चेत येण्याचा प्रयत्न केला होता. पण तो प्रयत्न भलताच यशस्वी ठऱला आणि त्यांची थेट पाकिस्तानात चर्चा झाली होती. तेव्हा आता एपस्टिन फाइलविषयी त्यांनी केलेल्या विधानांमुळे थेट अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात पृथ्वीराज चव्हाण हे नक्कीच चर्चिले जात असले पाहिजेत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला होता की, १९ डिसेंबरला भारताला नवा पंतप्रधान लाभेल. जेव्हा त्यांनी हा दावा केला तेव्हा तो काँग्रेसचाच कुणीतरी नेता भारताचा पंतप्रधान होईल असा दावा पृथ्वीराज चव्हाण करत आहेत की काय असे लोकांना वाटले होते, पण लोकांचे दुर्दैव की पृथ्वीराज चव्हाण हे पुढचा पंतप्रधान भाजपाचाच होणार याबाबत खात्री देत होते. त्याउपर त्यांनी हा पंतप्रधान मराठीच होणार अशी भविष्यवाणीही केली. त्यामुळे तर अवघा महाराष्ट्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रेमात आकंठ बुडाला. कदाचित, मराठी माणसावरील पृथ्वीराज चव्हाण यांच्या या प्रेमामुळे ठाकरे बंधूही पृथ्वीराज चव्हाण यांना आपल्या आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या प्रचारात स्टार प्रचारक म्हणून घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरला देशात हा सगळा खेळ होणार असल्याचे सांगत असताना २० डिसेंबर ही तारीख आली तरीही दिल्लीत कोणत्याच हालचाली होत नाहीत असे दिसते आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याचे काय होणार अशी सगळ्यांनाच चिंता लागली आहे. सध्या आजारी असले तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यामुळे बरे वाटू लागलेले संजय राऊत हे उबाठाचे प्रवक्तेही १९ डिसेंबरकडे डोळे लावून बसले होते. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील तेव्हा होतील पण निदान कुणीतरी मराठी पंतप्रधान होईल आणि महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची ज्या नामुष्कीबद्दल गेली अनेक दशके शक्यता व्यक्त केली जात आहे, ती टळेल असा त्यांचा होरा होता. पण २० डिसेंबर ही तारीख आली तरी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असल्यामुळे नेमके चुकले कुठे याचा अंदाज सगळे घेऊ लागले आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी तरीही २० डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेत एपस्टिनच्या फाइलमधून ३०० जीबी डेटा बाहेर येणार असल्यामुळे अजूनही पंतप्रधान बदलू शकेल, याची कुठेतरी आशा व्यक्त केली आहे. अर्थात, १९ तारखेचा मुहूर्त मात्र टळला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी हे अचानक पंतप्रधान बदलण्याचे का मनावर घेतले हे कुणालाच ठाऊक नाही. एपस्टिन फाइलमधील अनेक गुपितांपेक्षाही ते मोठे गुपित आहे. ते कुठल्या फाइलमध्ये असेल हे कुणालाच माहीत नाही. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे तसे मोकळेच आहेत, त्यामुळे त्यांनी सध्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांचे सातत्याने एपस्टिन फाइलकडे लक्ष आहे. शिवाय, त्यातून जो काही डेटा येतोय, तो मसालेदार आहे. बिल क्लिन्टन, बिल गेट्स, डोनाल्ड ट्रम्प यांचे एपस्टिनने दिलेल्या पार्ट्य़ामधील फोटो पाहण्यात अनेकांना मजा येऊ शकते. त्यातूनच काहीतरी हाती लागेल असा होरा पृथ्वीराज चव्हाणांचा असावा. ते अनेक पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत म्हणालेही की, मराठी पंतप्रधान होणार हे मी असेच जरा गमतीत बोललो. पण त्यांचे हे बोलणे गमतीतले नाही. कारण देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची चर्चा व्हावी आणि त्यानिमित्ताने भाजपाच्या गोटात एखादा फटाका फोडता येतो का ते पाहावे हा त्यांचा प्रयत्न होता. अर्थात, भाजपातील सगळे नेते अशा फटाक्यांमुळे सैरावैरा धावत सुटतील अशी शक्यता नाही. तरीही पृथ्वीराज यांनी फावल्या वेळेत हे करून पाहावे म्हणून मराठी पंतप्रधानपदाची हूल उठविली. आता त्यांचे समर्थक असलेले अनेक पत्रकार, कार्यकर्ते हे पृथ्वीराज चव्हाण यांनी कशी गुगली टाकली आहे, याची चर्चा करत आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे कसे मुरलेले नेते आहेत, त्यांनी एपस्टिन फाइलची चर्चा करून कसा देशभरात गदारोळ निर्माण केला आहे, याविषयीही कौतुकाने बोलले जात आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देशात वातावरण ढवळून काढण्याची ही क्षमता राहुल गांधी यांच्या मात्र ध्यानी आलेली दिसत नाही. ते सध्या जर्मनीत आहेत खरे पण इथे पृथ्वीराज चव्हाण चमकू लागले आहेत, हे त्यांच्या गावीही नसेल.
तसेही नरेंद्र मोदी यांना हटविण्याची अनेकांची इच्छा आहे. ती इच्छा अनेकजण बोलूनही दाखवत असतात. आता एपस्टिन फाइलमधून मोदींची गच्छंती करण्याचा सोपा मार्ग मोदीविरोधकांना गवसलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते जो ३०० जीबीचा डेटा मिळाला आहे, तो खरवडून काढल्यावर त्यातून काहीतरी हाती गवसेल असा अंदाज आहे. पण याला किती आठवडे लागतील, किती दिवस वाट पाहावी लागेल हे माहीत नाही. पण ती वाट पाहण्यास काँग्रेस समर्थक, मोदी विरोधक तयार आहेत. सध्या त्यांच्याकडे सत्ता नसल्यामुळे बराच मोकळा वेळ आहे. त्यामुळे ३०० जीबी डेटापैकी १५० जीबी डेटा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात आला तर लवकरात लवकर तो हातावेगळा करून मोदींची कोंडी करता येऊ शकेल. पण तूर्तास मात्र १९ डिसेंबरला मराठी पंतप्रधान होता होता राहिला आहे हे सत्य आहे. अगदी थोडक्यात ही संधी हुकली आहे. यानिमित्ताने अशीही चर्चा रंगली आहे की, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देशात खळबळ उडविण्याची ताकद लक्षात घेता मराठी पंतप्रधान होईल तेव्हा होईल पण निदान काँग्रेसचा मराठी अध्यक्ष तर होऊ शकेल अशी शक्यता नाकारता येत नाही. ती क्षमता पृथ्वीराज चव्हाण यांच्यात नक्कीच आहे.
हे ही वाचा:
विजयासोबत हार्दिकची माणुसकी जिंकली
राजस्थानमधून धर्मांतराच्या कारवाया करणाऱ्या जर्मन जोडप्यासह सहा जणांना अटक
“हिंदू तरुणाच्या मारेकऱ्यांना बांगलादेश काय शिक्षा देणार?”
ठाकरे ब्रँडचं काय होणार?
मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा असल्या तरी अद्याप अधिकृत अशी घोषणा झालेली नाही. त्यातच आता काँग्रेसने स्वतंत्रपणे पालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंचा मार्ग हा मोकळा झाला आहे. पण ते वाटते तितके सोपे राहिलेले नाही.
राज्यात महानगर पालिकांच्या निवडणुका लागल्यापासून मुंबईत राजकीय समीकरणं कशी असतील? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीत भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणूक लढत आहेत. तर अजित पवारांना साईड लाईन केल्याचं चित्र आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत मात्र फाटाफूट झालेली आहे. उबाठा आणि मनसे एकत्र आली आहे. शरद पवार गटही ठाकरे बंधूसोबत जायला तयार आहे. मात्र काँग्रेसनं मुंबईत स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीचा बोऱ्या वाजला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातो. पण तूर्तास या दोघांनीही एकत्र येण्याचे ठरविल्याने त्यांना आता कशाचीही फिकीर करावीशी वाटत नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी मुंबईत काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला स्वत: हजर होते.
खरं तर, काही दिवस आधी रमेश चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली होती. या बैठकीत काँग्रेसनं मुंबई स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेस आपला निर्णय बदलेल आणि महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं समोर आलं आहे. स्वत: रमेश चेन्नीथला यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.
चेन्नीथला मुंबईत आले असता ठाकरे बंधूंना सोबत घेण्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपण मुंबईत स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आमची मुंबईत निवडणुकीची सगळी तयारी झाली आहे. आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत, असंही चेन्नीथला यांनी सांगितलं.V काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे बंधूंची अडचण वाढली आहे. हा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस स्वबळावर लढली तर अल्पसंख्याक मतं दुरावण्याची भीती ठाकरेंना आहे.
मुंबईत २२७ पैकी ४१ ठिकाणी मुस्लिम मतदारांचा तर ७० ठिकाणी मराठी मतदारांचा प्रभाव आहे. या मतदारसंघांवर ठाकरे बंधूंची नजर असेल पण काँग्रेस आता त्यांच्यासमोर उभी ठाकणार असल्यामुळे ही मुस्लिम किंवा मराठी मते कुणाला प्राधान्य देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. अर्थात, मराठी मतदार मात्र फक्त ठाकरे गटालाच पसंती दर्शवतील असे अजिबात नाही. भाजपा, शिवसेना यांच्यासह महायुती, काँग्रेस यांनाही ते मतदान करतील. तेव्हा काँग्रेस ठाकरे बंधू, महायुती अशा तिघांच्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पण काँग्रेसची मदार ज्या मुस्लिम आणि दलित मतदारांवर आहे, त्यात ठाकरे बंधूंना काही हिस्सा मिळणार का, हे मतदार त्यांना आधार देणार का हा प्रश्न आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीत असताना लोकसभेत मुस्लिम मतदारांनी उद्धव ठाकरेंना हात दिला होता. पण आता काँग्रेसच वेगळी झाल्यास ते मतदार त्याच ताकदीने शिवसेना उबाठाच्या पाठीशी उभे राहतील का हा चर्चेचा मुद्दा आहे.







