प्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांच्या हिट अँड रन मृत्यूप्रकरणी पंजाब पोलिसांनी एका ३० वर्षीय अनिवासी भारतीय (एनआरआय) व्यक्तीला अटक केली आहे. ११४ वर्षीय धावपटूंच्या मृत्यूच्या घटनेच्या ३० तासांच्या आत एनआरआय अमृतपाल सिंग ढिल्लनला अटक केली. या घटनेत वापरलेली फॉर्च्युनर कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
जालंधरच्या करतारपूरमधील दासुपूर गावातील रहिवासी ढिल्लन याला मंगळवारी (१५ जुलै) रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले आणि सध्या भोगपूर पोलिस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे आणि त्याला पोलिस कोठडीत घेतले जाण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर अधिकाऱ्यांनी संशयित वाहनांची यादी तयार केली होती. मंगळवारी संध्याकाळी उशिरा अधिकाऱ्यांना एक फॉर्च्युनर एसयूव्ही आढळली. प्राथमिक चौकशीत असेही आढळून आले की ही गाडी कपूरथळा येथील रहिवासी वरिंदर सिंग यांच्या नावावर नोंदणीकृत होती.
जालंधर पोलिसांचे पथक वरिंदर सिंगची चौकशी करण्यासाठी कपूरथळा येथे तातडीने पोहोचले. चौकशीदरम्यान वरिंदरने सांगितले की त्याने ही कार दोन वर्षांपूर्वी कॅनडाहून परतलेल्या अमृतपाल सिंग ढिल्लन या अनिवासी भारतीयाला विकली होती.
हे ही वाचा :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल
कबुतरखाने हटवण्यामागे काय कारण आहे?
संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर २५ टक्के सवलतीत!
युती गेली लांब आता चार महिने थांब !
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी अमृतपालने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितले की अपघाताच्या वेळी तो एकटाच होता आणि भोगपूरहून किशनगडला जात होता. यावेळी त्याच्या गाडीने बियास पिंडजवळ एका वृद्ध व्यक्तीला धडक दिल्याचे त्याने सांगितले. ढिल्लन याने दावा केला की त्यांना त्यावेळी हे माहित नव्हते की बळी फौजा सिंग आहेत आणि बातम्यांद्वारे त्यांच्या मृत्युच्या माहिती मिळाली. या प्रकरणात, कलम २८१ आणि १०५ अंतर्गत आदमपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.
प्रसिद्ध खेळाडू फौजा सिंग यांचे सोमवारी वयाच्या ११४ व्या वर्षी रस्ते अपघातात निधन झाले. जालंधर-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर चालत असताना त्यांना एका अज्ञात पांढऱ्या कारने धडक दिली. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.







