पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी (८ ऑगस्ट) नॅशनल असेंब्लीला माहिती दिली की भारतीय विमानांसाठी वायूक्षेत्र बंद करण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तान एअरपोर्ट्स अथॉरिटीला (PAA) अवघ्या दोन महिन्यांत ४.१ अब्ज पाकिस्तानी रुपयांहुन अधिक नुकसान झाले आहे. हा निर्णय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता.
पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, २४ एप्रिल ते ३० जून या कालावधीत हे नुकसान प्रामुख्याने ओव्हरफ्लाइंग रेव्हेन्यूमधून झाले, जे पूर्वी सांगितलेल्या ८.५ अब्ज रुपयांपेक्षा कमी आहे. पाकिस्तानने हा प्रतिबंध भारताने सिंधू जल करार निलंबित केल्यानंतर लावला होता. या निर्णयानंतर दररोज १०० ते १५० भारतीय विमानांनी पाकिस्तानच्या वरून उड्डाण करणे थांबवले, ज्यामुळे ट्रान्झिट ट्रॅफिकमध्ये सुमारे २० टक्के घट झाली.
दरम्यान, पाकिस्तानला अशा प्रकारचे नुकसान या आधीही सहन करावे लागले आहे. २०१९ मध्ये देखील अशाच प्रकारच्या हवाई क्षेत्र बंदीमुळे सुमारे ७.६ अब्ज रुपये (५४ दशलक्ष डॉलर्स) इतके नुकसान झाले होते, त्यावेळी १०० दशलक्ष डॉलर्सच्या नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला गेला होता.
नॅशनल असेंब्लीमध्ये निवेदन देताना पाक संरक्षण मंत्रालयाने सांगितले की अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असतो आणि हे ‘नोटिस टू एअरमेन’ (NOTAMs) द्वारे लागू केले जातात. मंत्रालयाने दावा केला की हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षेसाठी, पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यासाठी आणि लष्करी नियोजनासाठी घेतला गेला.
हे ही वाचा :
जेव्हा निवडणुका हरतात तेव्हा त्यांना कोणाला तरी दोष द्यावा लागतो!
दिल्लीत मुसळधार पावसात भिंत कोसळून २ मुलांसह ८ जणांचा मृत्यू!
पूर्व दिल्लीतील आनंद विहार येथील रुग्णालयात भीषण आग, एकाचा मृत्यू
आदित्य ठाकरे यांनी ‘धडक-२’ आणि गणपती विसर्जन यांच्यातील संबंध उलगडला
अधिकृत आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये पाकिस्तान एअरपोर्ट्स अथॉरिटीलाची सरासरी दैनंदिन ओव्हरफ्लाइट कमाई ५.०८ लाख डॉलर्स होती, जी २०२५ मध्ये वाढून ७.६० लाख डॉलर्स झाली होती. अशा परिस्थितीत सध्याची बंदी पाकिस्तानी विमान वाहतूक क्षेत्रासाठी मोठा धक्का मानली जात आहे.







