पाकिस्तानी चौकी उडवली; भारतीय सैन्याने शेअर केला प्रतिहल्ल्याचा व्हिडीओ

सर्व नापाक कारस्थानांना सक्तीने उत्तर देण्याचे आश्वासन

पाकिस्तानी चौकी उडवली; भारतीय सैन्याने शेअर केला प्रतिहल्ल्याचा व्हिडीओ

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव परिस्थिती अधिक चिघळली असून पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती केल्या जात आहेत. गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे हे सर्व नापाक प्रयत्न हाणून पाडत ५० ड्रोन टिपले. अशातच पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराने शुक्रवार, ९ मे रोजी नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतीय हल्ल्यात पाकिस्तानी लष्करी चौकी उध्वस्त केल्याची माहिती आहे. शिवाय या जबरदस्त कारवाईचा व्हिडीओही सैन्याकडून शेअर करण्यात आला आहे.

भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानी सैन्याने रात्री केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले प्रभावीपणे परतवून लावल्याचे लष्कराने म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सशस्त्र दलांनी केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनांना योग्य उत्तर दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा (सर्व जम्मू आणि काश्मीरमधील) आणि पठाणकोट (पंजाब) या भागात हवाई संरक्षण युनिट्सनी मोठ्या प्रमाणात केलेल्या काउंटर-ड्रोन ऑपरेशन दरम्यान लष्कराने पाकिस्तानने सोडलेले ५० हून अधिक ड्रोन निष्क्रिय केले.

नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचे ड्रोन हल्ले पूर्णपणे हाणून पाडून काही तासांनंतर, भारतीय लष्कराने शुक्रवारी त्यांच्या प्रतिहल्ल्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानी चौकी असल्याचे दिसून येत आहे. लष्कराच्या व्हिडिओमध्ये एका इमारतीला एक प्रक्षेपक उध्वस्त करताना दाखवले आहे. त्यांनी ती रचना काय होती किंवा ती कुठे होती याबद्दल तपशीलवार माहिती दिली नाही. “भारतीय सैन्य राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व नापाक कारस्थानांना सक्तीने उत्तर दिले जाईल,” असे एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा : 

भारतावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही!

राजस्थानमधून जेएफ-१७ चा एक पाकिस्तानी पायलट ताब्यात, दुसऱ्याचा शोध सुरू!

पाकिस्तानच्या कुरापतींना भारताचे चोख प्रत्युत्तर; ५० हून अधिक पाकचे ड्रोन पाडले

भारतातील ८,००० हून अधिक ‘एक्स’ अकाऊन्टस् ब्लॉक करण्याचे आदेश

यापूर्वी, गुरुवारी दुपारी संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, भारतीय सशस्त्र दलांनी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील १५ शहरांमधील लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, भारताने नेहमीच एका जबाबदार राष्ट्राची भूमिका बजावली आहे, खूप संयम बाळगला आहे आणि संवादाद्वारे समस्या सोडवण्यावर विश्वास ठेवला आहे. पण, जर कोणी या संयमाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल.

Exit mobile version