पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. याच दरम्यान, भारतासोबत युद्धाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक यांची नवीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून नियुक्ती केली आहे. मलिक यांना ऑक्टोबर २०२४ मध्ये इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंसचे (ISI) प्रमुख बनवण्यात आले होते. कॅबिनेट विभागाच्या अधिसूचनेनुसार, जनरल मलिक यांना अधिकृतपणे एनएसएची जबाबदारी देण्यात आली आहे.
अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘लेफ्टनंट जनरल मोहम्मद असीम मलिक हे तात्काळ प्रभावाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारतील.’ दरम्यान, ते पाकिस्तानचे १० वे एनएसए आहेत परंतु आयएसआय प्रमुखांना एकाच वेळी दोन्ही प्रमुख पदे सांभाळण्याची जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, असीम मलिक ऑक्टोबर २०२५ मध्ये आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर नोव्हेंबर २०२५ मध्ये सेवेतून निवृत्त होणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ (NSAB) मध्ये सुधारणा केल्यानंतर आणि रॉचे माजी प्रमुख आलोक जोशी यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.
हे ही वाचा :
भारताच्या इशाऱ्याला न जुमानता पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरूच!
काँग्रेसमध्ये इतकी अस्वस्थता का?
अयोध्येतील बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल!
भारताने शाहीद आफ्रिदीची लायकी दाखवली, केली ‘ही’ मोठी कारवाई!
दरम्यान, भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे आणि गेल्या काही दिवसांत भारत सरकारने अनेक बैठका घेतल्या आहेत. भारताच्या या बैठकांमुळे पाकिस्तान अस्वस्थ असून भारत कधीही हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे.







