अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच लंडनकडे जाणारी एअर इंडियाची फ्लाइट एआय-१७१ कोसळल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण जगभरात शोकाची लाट उसळली आहे. या विमानात २४० हून अधिक प्रवासी होते. हा अपघात शहरातील मेघाणीनगर भागाजवळ घडला. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी या अपघाताला “विनाशकारी दृश्य” असे संबोधून तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, “अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या अपघाताची बातमी अत्यंत दुःखद आहे. या विमानात अनेक ब्रिटिश नागरिक प्रवास करत होते. मी या घटनेवर सतत नजर ठेवून आहे. पीडित व त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत.”
या विमानात किमान १६९ भारतीय आणि ५३ ब्रिटिश नागरिक प्रवास करत होते आणि ते लंडनमधील गॅटविक विमानतळाकडे जात होते. ब्रिटनचे संरक्षणमंत्री डेव्हिड लॅमी यांनी देखील या अपघातावर तीव्र शोक व्यक्त केला. “अहमदाबादमध्ये झालेल्या या भयंकर विमान अपघाताच्या बातमीने मन हेलावून गेले आहे. सर्व प्रभावित व्यक्तींप्रती माझ्या सहवेदना आहेत. यूके सरकार भारतीय स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, माहिती मिळवणे आणि मदतकार्य राबवण्यासाठी काम करत आहे,” असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा..
दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही, फोटो आला समोर!
राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक
अहमदाबाद विमानतळावरील फ्लाइट ऑपरेशन्स स्थगित
विमान दुर्घटना : विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक होते
ब्रिटिश कंझर्वेटिव्ह पक्षाच्या खासदार प्रीती पटेल यांनी यूके सरकारला विनंती केली की, त्यांनी भारत सरकारसोबत समन्वय साधून ब्रिटिश कुटुंबांना मदत द्यावी. त्यांनी म्हटले, “अहमदाबादमधील या विमान अपघातामुळे प्रभावित सर्व लोकांसाठी माझ्या प्रार्थना आहेत. हे संकट त्या कुटुंबांसाठी फारच चिंतेचं कारण आहे ज्यांचे प्रियजन त्या विमानात प्रवास करत होते. यूके सरकारने तातडीने भारतीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदतीची उपाययोजना करावी.”
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केली. “भारतामधील प्रवासी विमान अपघाताची भयावह बातमी ऐकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील जनतेप्रती माझ्या गहिर्या संवेदना आहेत. आम्ही भारत, यूके, पोर्तुगाल आणि कॅनडाच्या पीडितांच्या पाठीशी आहोत. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना करतो,” असे त्यांनी म्हटले.
भारतातील रशियन राजदूत डेनिस अलीपोव यांनीही या अपघाताला “भीषण शोकांतिका” असे संबोधले. त्यांनी म्हटले, “अहमदाबादहून हृदयविदारक बातमी येत आहे. पीडितांचे नातेवाईक, भारतातील जनतेला आणि सरकारला माझ्या गहिर्या संवेदना.”







