पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सोमवारी कॅनडाच्या कॅलगरी शहरात पोहोचले. पंतप्रधान मोदींचे स्वागत कार्यवाहक भारतीय उच्चायुक्त चिन्मय नाईक, कॅनडाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच स्थानिक ‘फर्स्ट नेशन्स’ समुदायाच्या नेत्यांनी केले. पंतप्रधान मोदी कनानास्किस येथे जातील, जिथे सोमवारी कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमध्ये शिखर परिषदेला सुरुवात झाली. मंगळवारच्या सत्रात मोदी यांच्यासह इतर निमंत्रित नेते सहभागी होतील.
या आधी मोदी सायप्रसमध्ये थांबले होते, जिथे त्यांनी राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी भारत-सायप्रस संबंधांबाबत सविस्तर चर्चा केली. सायप्रस रवाना होण्यापूर्वी मोदींनी ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले होते की, जी-७ परिषद जागतिक मुद्द्यांवर दृष्टिकोनांची देवाण-घेवाण करण्यासाठी आणि ‘ग्लोबल साउथ’च्या (विकसनशील राष्ट्रांच्या) प्राथमिकतांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी एक उत्तम मंच आहे.
हेही वाचा..
सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बिघाड
१०० भारतीयांचा पहिला गट इराणहून अर्मेनियाला रवाना!
अयातुल्ला खमेनी यांना मारल्याने संघर्ष संपेल!
या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, इटलीच्या जिओर्जिया मेलोनी, जपानचे शिगेरू इशिबा, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज, युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन, आणि युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा, तसेच मेजबान मार्क कार्नी यांच्यासोबत चर्चा करतील. या जी-७ परिषदेसाठी इतर काही निमंत्रित नेत्यांमध्ये युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की, मेक्सिकोच्या क्लॉडिया शिनबाम, ब्राझीलचे लुईज इनासिओ लूला दा सिल्वा, दक्षिण कोरियाचे ली जे-म्यांग, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचा समावेश आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर, पंतप्रधान मोदींसाठी जगभरातील प्रभावी नेत्यांशी प्रत्यक्ष भेटीचा हा एक महत्त्वाचा क्षण आहे. पंतप्रधान मोदींची ही भेट भारत-कॅनडा संबंधांसाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यावर झाली आहे. मार्क कार्नी दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंध पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. कॅनडामधील भारतीय वंशाचे नागरिक मान पारेख यांनी सांगितले, “गेल्या काही वर्षांत भारत-कॅनडा संबंध अतिशय तणावपूर्ण झाले होते. पण पंतप्रधान मार्क कार्नी यांचे आमंत्रण ही नव्या आशेची किरण आहे. हा संबंध पुन्हा सुधारण्याची एक संधी आहे.
कॅनडियन हिंदू चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष कुशाग्र शर्मा म्हणाले, “पंतप्रधान मोदींचे येथे आगमन हे दर्शवते की दोन्ही देश एकत्र काम करण्यास इच्छुक आहेत. यामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक हिताला गती मिळेल. व्यापार आधीपासून सुरू आहे आणि तो अधिक वाढेल. मोदींच्या भेटीने कॅनडामधील भारतीय वंशाच्या समुदायामध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. सध्या कॅनडामध्ये १८ लाख भारतीय-कॅनेडियन, आणि १० लाख भारतीय नागरिक आहेत – हे कॅनडातील सर्वांत मोठे प्रवासी समुदाय मानले जातात.







