दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनादरम्यान सोमवारी (२० जुलै) मोठा तणाव निर्माण झाला. संसदेकडे काढण्यात येणाऱ्या ‘चला संसद’ मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी सौम्य लाठीमार केला आणि अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
हे आंदोलन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी, तसेच नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या कथित पेपरफुट प्रकरणांविरोधात सुरू आहे. आंदोलनाचे नेतृत्व अभिजीत दिपके करत असून, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनाही या आंदोलनाचा पाठिंबा आहे. वांगचुक यांना उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांनी जंतर-मंतरवरून संसदेकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचे सांगत परवानगी नाकारली. संसद परिसरात सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर आणि संसद परिसरात अभूतपूर्व सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. ३०० हून अधिक पोलिस कर्मचारी, रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF), बॅरिकेड्स, अश्रुधूर फेकणारी वाहने आणि बहुपदरी सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. राजधानीच्या सीमांवरही विशेष तपासणी सुरू होती, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर आंदोलक दिल्लीत प्रवेश करू शकणार नाहीत.
हे ही वाचा:
रुग्णालयातील निष्काळजीपणाचा बळी? छताचा पंखा कोसळून रुग्णाचा मृत्यू
युद्धाच्या धगीचा भारतीय शेअर बाजाराला फटका; तरी ‘हे’ सेक्टर सुपरहिट!
देशभर पुन्हा बरसणार पाऊस; अनेक राज्यांत मुसळधार सरी
सलग नवव्या रात्री अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले
सकाळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक जंतर-मंतर येथे जमा झाले. पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही काही आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, CJP ने पोलिस कारवाईचा निषेध करत सरकारवर आंदोलन दडपण्याचा आरोप केला आहे. आंदोलन शांततापूर्ण असल्याचा दावा करत, पोलिसांनी अनावश्यक बळाचा वापर केल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.
