प्रभादेवी येथील १२५ वर्षांहून अधिक जुना पूल शुक्रवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) या पुलाचे पाडकाम करून त्याजागी आधुनिक द्विस्तरीय पूल उभारण्यात येणार असून, हे काम पूर्ण होऊन नवीन पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास किमान २० महिने लागण्याची शक्यता आहे. पुल बंद केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली असून शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतुकीचे नवीन नियोजन राबविण्यात आले आहे.
पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्यांसाठी दादर पूर्व ते दादर पश्चिम आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहनचालकांना टिळक पुलाचा वापर करावा लागेल. परळ पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परळकडे जाणाऱ्यांना सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत करी रोड पुलाचा वापर करण्याची परवानगी असेल, तर परळ आणि भायखळा पूर्वेकडून प्रभादेवी, वरळी, सागरी किनारा मार्ग आणि सागरी सेतूकडे जाणाऱ्यांसाठी चिंचपोकळी पुल खुला राहील. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्यांसाठी दादर पश्चिम ते दादर पूर्व वाहतुकीसाठी टिळक पूल वापरणे बंधनकारक असेल. प्रभादेवी आणि लोअर परळ पश्चिमेकडून परळ, टाटा रुग्णालय, केईएम रुग्णालयाकडे जाणाऱ्यांना दुपारी तीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत करी रोड पुलावरून प्रवास करता येईल, तर सागरी किनारा मार्ग, सागरी सेतू तसेच प्रभादेवी, वरळीहून परळ आणि भायखळा पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांना चिंचपोकळी पुलाचा वापर करावा लागेल.
महादेव पालव मार्गावर सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत काॅ. कृष्णा देसाई चौकाकडून शिंगटे मास्तर चौकाकडे वाहतूक सुरू राहील, तर दुपारी तीन ते रात्री अकरा या वेळेत शिंगटे मास्तर चौकाकडून काॅ. कृष्णा देसाई चौकाकडे वाहतूक सुरू राहील. रात्री अकरा ते सकाळी सात या वेळेत दोन्ही मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या असतील. काही मार्गांवर नो पार्किंग नियम लागू करण्यात आले आहेत. ना.म.जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, भवानी शंकर मार्ग, रावबहाद्दूर मार्ग आणि संपूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर दोन्ही वाहिन्यांवर वाहन उभे करण्यास मनाई असेल. सेनापती बापट मार्गावरील वडावा नाका ते फितवाला जंक्शनदरम्यान दुहेरी मार्ग कायम राहील. पुल बंदी आणि वाहतुकीतील बदलामुळे या परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रवासाची योजना आखण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.







