भारताच्या युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदनं पुन्हा एकदा आपलं कसब सिद्ध करत, लास वेगासमध्ये सुरू असलेल्या फ्रीस्टाईल शतरंज ग्रँड स्लॅम स्पर्धेत जगप्रसिद्ध मॅग्नस कार्लसनला केवळ ३९ चालींत हरवलं. पाच वेळा विश्वविजेता ठरलेला कार्लसन, याआधी भारताच्याच डी. गुकेशकडून दोन वेळा पराभूत झाला होता, आणि आता प्रज्ञानंदकडूनही त्याला मोठा धक्का बसला.
१९ वर्षीय प्रज्ञानंद सध्या आठ खेळाडूंनी असलेल्या व्हाईट ग्रुपमध्ये ४.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहे. त्याने स्पर्धेची सुरुवात नोदिरबेक अब्दुसत्तोरोवविरुद्ध ड्रॉने केली होती. त्यानंतर असाउबायेवा, कीमर आणि चौथ्या फेरीत थेट कार्लसनचा पराभव करत चोख खेळ दाखवला.
या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला १० मिनिटांचा वेळ आणि प्रत्येक चालीवर १० सेकंदांचा बोनस दिला जातो.
दुसरीकडे, कार्लसनने स्पर्धेची सुरुवात दोन विजयांनी केली, पण नंतर त्याचा फॉर्म ढासळला. प्रज्ञानंद आणि वेस्ली सोकडून पराभव, दोन सामने ड्रॉ आणि शेवटी अरोनियनकडून प्लेऑफमध्ये दुहेरी पराभव – यामुळे तो आता निचल्या ब्रॅकेटमध्ये गेला असून त्याचं अव्वल स्थान गमावलं आहे.
व्हाईट ग्रुपमध्ये प्रज्ञानंद, अब्दुसत्तोरोव आणि सिंडारोव यांनी प्रत्येकी ४.५ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावलं, तर अरोनियननं ४ गुण घेत कार्लसनला मागे टाकलं.
ब्लॅक ग्रुपमध्ये अमेरिकेचा हिकारू नाकामुरानं जबरदस्त कामगिरी करत ७ पैकी ६ गुण मिळवत टॉप स्थान मिळवलं. त्याच्यासह हांस नीमन, अर्जुन एरिगैसी आणि फॅबियानो कारुआनाने पुढील फेरीत प्रवेश केला. कारुआनानं सुरुवातीचे सहा सामने ड्रॉ खेळले होते, पण अखेरच्या सामन्यात नीमनला हरवत महत्वाचा विजय मिळवला.
हेही वाचा:
त्या निष्पाप मृत्यूंना जबाबदार आरसीबीच!
जय हो भारतमातेच्या लेकींचा! इंग्लंडमध्ये रचला इतिहास!
नवी मुंबईत 18 तास पाणी पुरवठा बंद
इस्रायलमध्ये राजकीय अस्थिरता वाढली
लास वेगासच्या विन हॉटेलमध्ये पहिल्यांदाच अमेरिका फ्रीस्टाईल शतरंज स्पर्धेचं आयोजन करत आहे. १६ खेळाडूंनी आता नॉकआउट टप्प्यात प्रवेश केला असून कार्लसनसारखे खेळाडू निचल्या ब्रॅकेटमधून अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न करतील. गुरुवारी उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत, आणि अंतिम विजेत्यास तब्बल २ लाख अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळणार आहे.







