पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी सायप्रस सरकारने त्यांच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले. सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांनी पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस III’ हा पुरस्कार प्रदान केला. पंतप्रधान मोदींनी हा सन्मान देशातील जनतेला अर्पण केला. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले, “ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस III या सन्मानासाठी मी आपले (सायप्रस राष्ट्रपती), सायप्रस सरकारचे आणि सायप्रसच्या जनतेचे मन:पूर्वक आभार मानतो. हा सन्मान केवळ माझा नाही, हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे. त्यांच्या सामर्थ्यांचा आणि आकांक्षांचा सन्मान आहे. हा आपल्या देशाच्या सांस्कृतिक बंधुत्व आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारसरणीचा सन्मान आहे. मी हा पुरस्कार भारत आणि सायप्रस यांच्यातील दृढ संबंधांना आणि आपल्या सामायिक मूल्यांना अर्पण करतो. सर्व भारतीय नागरिकांच्या वतीने मी हा सन्मान अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने स्वीकारतो.”
पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले की, “हा सन्मान शांती, सुरक्षा, सार्वभौमत्व, प्रादेशिक एकात्मता आणि आपल्या लोकांच्या समृद्धीसाठी असलेल्या आपल्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. मी या सन्मानाला भारत-सायप्रस संबंधांबद्दलची एक जबाबदारी समजतो आणि त्याच भावनेने तो स्वीकारतो. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, “आपली सक्रिय भागीदारी भविष्यात अधिक उंची गाठेल. आपण दोन्ही देशांच्या विकासासाठीच नव्हे, तर शांततामय आणि सुरक्षित जागतिक वातावरण निर्माण करण्यासाठीही एकत्र काम करू.
हेही वाचा..
अर्कमूळ : अनेक समस्यांवर करते उपचार
मुंबईतील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये उसळी
१९८० नंतर रुमेटॉइड आर्थरायटीसच्या प्रकरणांमध्ये का वाढ होतेय…
सायप्रसचा हा सर्वोच्च सन्मान मिळाल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, “सायप्रसचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारियोस III’ सन्मान मिळाल्याने मी अत्यंत आनंदित आहे. मी हा सन्मान आपल्या दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना अर्पण करतो. त्याआधी, श्रीलंकेनेही पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘मित्र विभूषण’ प्रदान केला होता. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी त्यांना हा सन्मान दिला होता.







