पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २७ ते २९ जूनदरम्यान आफ्रिकेतील सेशेल्सच्या (Seychelles) तीन दिवसीय राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत. सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी (५० व्या वर्धापन दिन) सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. भारत आणि सेशेल्स यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध, सागरी सहकार्य आणि द्विपक्षीय भागीदारी अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या दौऱ्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी हा दौरा करणार आहेत. यापूर्वी २०१५ मध्ये मोदी यांनी सेशेल्सला भेट दिली होती. यंदा सेशेल्स आपला राष्ट्रीय दिनाचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असून या विशेष सोहळ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात भारतीय सशस्त्र दलाचे एक पथक तसेच भारतीय नौदलाची दोन युद्धनौकाही सहभागी होणार आहेत. यामुळे भारत-सेशेल्स संरक्षण आणि सागरी सहकार्याचे महत्त्व अधोरेखित होणार आहे.
दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पॅट्रिक हर्मिनी यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा आढावा घेतला जाईल. तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय संसदेला (नॅशनल असेंब्ली) संबोधित करणार असून तेथील भारतीय वंशाच्या नागरिकांशी आणि भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.
हे ही वाचा:
बांगलादेशी नागरिकांसाठी पुन्हा पर्यटन व्हिसा सेवा सुरू
बंगालमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याप्रकरणी स्थानिक नेत्याला अटक
“पत्रकारांविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्याचा हेतू नव्हता”
खासदार संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळ
भारत आणि सेशेल्स यांच्यात दीर्घकाळापासून घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. समान इतिहास, सांस्कृतिक नाती आणि लोकांमधील परस्पर संबंधांवर हे संबंध आधारित आहेत. हिंदी महासागर क्षेत्रातील महत्त्वाचा सागरी शेजारी देश म्हणून सेशेल्सला भारताच्या ‘महासागर’ (Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) या धोरणात तसेच ग्लोबल साऊथसंदर्भातील भारताच्या दृष्टीकोनात विशेष स्थान आहे. हा दौरा दोन्ही देशांमधील संबंधांना नवी चालना देण्यास मदत करेल. तसेच व्यापार, सुरक्षा, सागरी सहकार्य, विकास आणि लोकांमधील संबंध अधिक मजबूत करण्याच्या दोन्ही देशांच्या बांधिलकीला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
