पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ७२व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत. हा उद्घाटन सोहळा वाराणसी येथील डॉ. संपूर्णानंद क्रीडा संकुलात पार पडणार आहे.
या उद्घाटन समारंभाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री व उत्तर प्रदेश व्हॉलीबॉल संघाचे अध्यक्ष ब्रजेश पाठक, आयोजन समितीचे अध्यक्ष व वाराणसीचे महापौर अशोक कुमार तिवारी यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
४ ते ११ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील ५८ संस्थांच्या संघांचे सुमारे १,००० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. सर्व सामने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टेरा फ्लेक्स फ्लोअर असलेल्या कोर्टवर खेळवले जाणार असून, या फ्लोअरचे काम अंतिम टप्प्यात आहे. खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी दर्जावर विशेष भर देण्यात येत आहे.
आयोजन समितीचे अध्यक्ष अशोक कुमार तिवारी स्वतः संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. शुक्रवारी त्यांनी नगरसेवक आणि भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. स्पर्धा यशस्वी आणि भव्य स्वरूपात पार पडावी यासाठी कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेमुळे भारतीय व्हॉलीबॉलमध्ये उच्च दर्जाची स्पर्धा, खेळभावना आणि नव्या प्रतिभेला वाव मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. तसेच या आयोजनामुळे वाराणसी शहराची ओळख राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या क्रीडा आयोजनांचे केंद्र म्हणून अधिक बळकट होणार आहे.
स्पर्धेचा समारोप ११ जानेवारी रोजी होणार असून, या समारंभाला उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, तर भाजपचे प्रदेश संघटन मंत्री धर्मपाल सिंह हे विशेष अतिथी असतील.







