दृश्यम 3 चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की आगामी दृश्यम मध्ये अक्षय खन्ना यांच्या भूमिकेत आता जयदीप अहलावत दिसणार आहेत. अक्षय खन्ना यांनी शूटिंग सुरू होण्याच्या केवळ काही दिवस आधीच चित्रपटातून अचानक माघार घेतल्यामुळे हा बदल करावा लागला. कुमार मंगत यांनी अक्षय खन्नांवर अव्यावसायिक वर्तनाचा आरोप केला असून, या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
कुमार मंगत यांच्या म्हणण्यानुसार, अक्षय खन्नांसोबत बराच काळ चर्चा आणि पुन्हा-पुन्हा वाटाघाटी करून औपचारिक करार करण्यात आला होता आणि त्यांचे मानधनही निश्चित झाले होते. सुरुवातीला अक्षय यांनी विग न घालण्यास सहमती दर्शवली होती, कारण दृश्यम 3 हा सिक्वेल असल्याने कथानकातील सातत्य (continuity) राखणे आवश्यक होते. दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी त्यांना समजावून सांगितले की विग वापरल्यास सातत्य बिघडेल, आणि तेव्हा अक्षय यांनी हा मुद्दा मान्य केला होता.
मात्र नंतर त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांनी (त्यांचे ‘चमचे’ असल्याचा आरोप करत) त्यांना विग घातल्यास अधिक स्मार्ट दिसतील असा सल्ला दिला. त्यामुळे अक्षय यांनी पुन्हा विग घालण्याची मागणी केली. दिग्दर्शक अभिषेक पाठक यावेळीही चर्चा करण्यास तयार होते, परंतु त्यानंतर अक्षय खन्नांनी अचानक चित्रपटात काम करण्यास नकार दिला, असे कुमार मंगत यांनी सांगितले.
निर्मात्यांनी अक्षय खन्नांच्या करिअरवरही थेट भाष्य केले. त्यांच्या मते, सेक्शन 375 (2019) आणि दृश्यम 2 (2022) आधी अक्षय खन्नांना फारसे काम मिळत नव्हते. “एक काळ असा होता की अक्षयकडे काहीच काम नव्हते. त्याच वेळी मी त्यांच्यासोबत सेक्शन 375 केला. तेव्हाही अनेकांनी आम्हाला त्यांच्यासोबत काम करू नका, कारण त्यांचे वर्तन अव्यावसायिक आहे, असे सांगितले होते. सेटवर त्यांची ऊर्जा पूर्णपणे नकारात्मक असते,” असे कुमार मंगत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की सेक्शन 375 मुळे अक्षय खन्नांना पुन्हा ओळख मिळाली आणि नंतर दृश्यम 2 मुळे त्यांना मोठ्या ऑफर्स मिळू लागल्या. “त्याआधी ते 3–4 वर्षे घरीच बसून होते,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
हे ही वाचा:
भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब बनला
पुढील पाच वर्षांत ४८ स्टेशन्सची क्षमता दुपटीने होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावतीत सन्मान
कुमार मंगत यांनी असा आरोपही केला की, अलीकडील यश अक्षय खन्नांच्या डोक्यात गेले आहे. “काही कलाकार चित्रपट हिट झाला की स्वतःलाच स्टार समजू लागतात. अक्षयसोबत हेच झाले आहे. त्यांना वाटते की ते आता सुपरस्टार झाले आहेत. त्यांनी असेही म्हटले की, ‘धुरंधर’ चित्रपट माझ्यामुळे चालतो आहे, असे अक्षय खन्नाला वाटते. पण त्याने हे समजून घ्यायला हवे की कोणताही चित्रपट अनेक घटकांमुळे यशस्वी होतो,” असे त्यांनी सांगितले.
अक्षय खन्नांच्या बाहेर पडण्यानंतर जयदीप अहलावतची दृश्यम 3 मध्ये अधिकृत एंट्री झाली आहे. कुमार मंगत म्हणाले, “दृश्यम ही खूप मोठी ब्रँड फ्रँचायझी आहे. कोण कलाकार आहे किंवा नाही, याने फरक पडत नाही. देवाच्या कृपेने आम्हाला अक्षयपेक्षा उत्तम अभिनेता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम माणूस मिळाला आहे. जयदीपच्या करिअरमधील पहिल्या चित्रपटांपैकी एक आक्रोश (२०१०) मीच निर्माण केला होता.”







