रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन दोन दिवसीय राजकीय भेटीसाठी भारतात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर स्वतः उपस्थित राहून त्यांचे उबदार स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आलिंगन देत अभिवादन केले आणि त्यानंतर ते एका वाहनातून पुढील कार्यक्रमांकडे रवाना झाले.
विमानतळावर आयोजित स्वागत सोहळ्यात पुतीन यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि त्याचे कौतुकही केले. दिल्लीतील विविध ठिकाणी दोन्ही देशांच्या मजबूत मैत्रीचे दर्शन घडवणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदी आपल्या निवासस्थानी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या सन्मानार्थ डिनरचे आयोजन करणार आहेत. गेल्या वर्षी मोदी यांच्या मॉस्को भेटीत पुतीन यांनी दिलेल्या आदरातिथ्याची आठवण या भेटीत पुन्हा ताजी झाली आहे. २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
शुक्रवारी होणारी तेवीसावी भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद अमेरिकेने भारतावर टॅरिफ वाढवल्यानंतरच्या पार्श्वभूमीवर अधिक महत्त्वाची ठरत आहे. या परिषदेत संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबरोबरच व्यापार आणि ऊर्जा भागीदारीवरही भर दिला जाणार आहे.
औपचारिक बैठकीपूर्वी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले जाईल. तसेच ते महात्मा गांधी स्मारकावर पुष्पांजली अर्पण करतील.
रशियन सरकारी वृत्तसंस्था ‘तास’च्या माहितीनुसार, पुतीन यांचे वरिष्ठ सहकारी युरी उशाकोव यांनी सांगितले की, मोदी–पुतीन यांचा डिनरदरम्यानचा संवाद हा संपूर्ण दौर्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरेल. या चर्चेत द्विपक्षीय संबंध, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि रणनीतिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. व्यापार, गुंतवणूक आणि विविध आर्थिक करारांवरही निर्णय अपेक्षित आहेत.
दोन्ही देश २०३० पर्यंत आर्थिक सहकार्य वाढविण्याचे नवे मार्ग शोधणार असल्याची माहितीही उशाकोव यांनी दिली. भारतीय कामगारांच्या रशिया ये-जा प्रक्रियेतील सुलभता वाढविणारा करार आणि भारत–युरेशियन आर्थिक संघामधील मुक्त व्यापार कराराबाबतही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
शिखर परिषदेनंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या राजकीय भोजनास उपस्थित राहतील. तसेच रशियन राज्य प्रसारक ‘आरटी’च्या भारतातील कार्यालयाचे ते उद्घाटनही करणार आहेत.
हेही वाचा:
भारत-रशिया झेंडे आणि विशेष रोशनाईने सजले पंतप्रधानांचे निवासस्थान
बीआरओ प्रोजेक्ट ‘हिमांक’चा लेहमध्ये स्थापना दिवस
आम्रपाली आणि निरहुआ यांचे नवीन रोमँटिक गाणे रिलीज
माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचे निधन
भारतीय विदेश मंत्रालयाने सांगितले की, ही अधिकृत भेट दोन्ही देशांच्या नेत्यांना द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची आणि प्रादेशिक तसेच जागतिक मुद्द्यांवरील सामायिक दृष्टिकोन दृढ करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे.
रशिया हा भारताचा जुना आणि विश्वासू भागीदार असून, २००० साली झालेल्या ‘भारत–रशिया सामरिक भागीदारी घोषणापत्र’नंतर दोन्ही देशांमधील सहकार्य राजकारण, सुरक्षा, संरक्षण, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान आणि संस्कृतीसह सर्वच क्षेत्रांत अधिक बळकट झाले आहे.







