बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार पुनरावलोकन मोहिमेला विरोध करण्यासाठी महाआघाडीत सहभागी सर्व घटक पक्षांचे नेते रस्त्यावर उतरले. या वेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही पटणा येथे पोहोचले आणि महाआघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झाले. आता भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी म्हटलं की, “राहुल गांधी पिकनिक साजरी करायला आले होते. बिहारच्या समस्या त्यांना अजिबात महत्त्वाच्या वाटत नाहीत.” पटण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “राहुल गांधींचा बिहारच्या विकासाशी काहीही संबंध नाही. ते फक्त पिकनिकसाठी येतात आणि निघून जातात. मात्र, बिहारची प्रगती त्यांनी नक्कीच पाहिली असेल. बिहारचे विमानतळ पाहिले असेल, ते खूप चांगले झाले आहे.”
भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी काँग्रेसवर टोला लगावत म्हटलं, “लोकसभा निवडणुकीत त्यांना ९९ जागा मिळाल्या, तेव्हा राहुल गांधींना वाटलं की त्यांनी संपूर्ण देश जिंकलाय. मात्र, हे लोकशाही आहे, जिथे जनतेकडून मतं मिळवावी लागतात, आशीर्वाद मिळावा लागतो. हे राजतंत्र नाही. त्यांनी असंही सांगितलं की, “गांधी कुटुंबाचं राजतंत्र आता संपलं आहे, आता ही जनता चालवणारी लोकशाही आहे आणि जनता ठरवेल.
हेही वाचा..
तेजस्वी यादव यांच्या दाव्यांची पोलखोल
तिरुमला देवस्थानचा कर्मचारी लपूनछपून जात होता चर्चमध्ये!
अभिनेत्री अरुणा यांच्या घरी ईडीचा छापा
गुजरात पुल दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू
दुसरीकडे, भाजप नेते आणि माजी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विरोधकांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं, “राहुल गांधी आणि तेजस्वी यादव रस्त्यावर उतरले, हे त्यांचं अधिकार आहे. पण प्रश्न असा आहे की या देशात फक्त भारतीय नागरिक आणि १८ वर्षांवरील व्यक्तीच मतदान करू शकते. जिथून तो उमेदवार आहे, तिथूनच तो मतदान करू शकतो. जर मतदार यादीचे पुनरावलोकन चालू आहे, तर त्यांना काय त्रास आहे?”
बिहारचे मंत्री मंगल पांडेय म्हणाले, “मतदार यादीसंदर्भात एक ठरावीक प्रक्रिया आहे. हे लोक निवडणूक आयोगाला थेट आव्हान देत आहेत. नंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी धाव घेतली. पण आता त्यांनाही न्यायालयावर विश्वास राहिलेला नाही. न्यायालयात बोलण्याऐवजी ते थेट रस्त्यावर उतरले. यामागचं कारण म्हणजे त्यांना कुठेही विश्वास राहिलेला नाही. म्हणून आता ते गोंधळ घालण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. महत्वाचं म्हणजे, महाआघाडीने बुधवारी मतदार पुनरावलोकनाच्या विरोधात बिहारमध्ये ‘चक्का जाम’ आंदोलनाचं आवाहन केलं होतं. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आणि वाहतुकीत अडथळा निर्माण केला.







