कर्नाटकचे सहकार मंत्री के.एन. राजन्ना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी राजीनामा दिला. सहकार मंत्री पदाचा राजीनामा देणारे के.एन. राजन्ना हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे जवळचे सहकारी असल्याचे मानले जाते. त्यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगली आहे. पक्ष विरोधी वक्तव्य केल्याने त्यांचा राजीनामा मागितल्याचे बोलले जात आहे. तर ‘राहुल गांधींना सत्य पचत नाही म्हणून राजन्नांचा राजीनामा घेतला, असे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी म्हटले आहे.
‘मतदार यादीचा मसुदा तयार झाला तेव्हा आमचे सरकार सत्तेत होते’
झाले असे की, कर्नाटकचे मंत्री के.एन. राजन्ना यांनी राहुल गांधींच्या निवडणूक आयोगावरील आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “पाहा… जर आपण अशा गोष्टींबद्दल बोलू लागलो तर वेगवेगळी मते समोर येतील. मतदार यादी कधी तयार झाली? ती आमच्या स्वतःच्या सरकारच्या सत्तेत असताना तयार झाली. त्यावेळी सर्वजण डोळे मिटून शांत बसले होते का? या अनियमितता झाल्या, हे खरे आहे. यात काहीही खोटे नाही.”
राजन्ना म्हणाले, या अनियमितता आमच्या डोळ्यांसमोर घडल्या, आम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही त्यावेळी लक्ष दिले नाही. म्हणून भविष्यात आम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल… महादेवपुरात खरोखरच फसवणूक झाली होती. एका व्यक्तीची तीन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी झाली आणि तिन्ही ठिकाणी मतदान झाले.
पण जेव्हा मसुदा मतदार यादी तयार केली जाते तेव्हा आपण त्यावर लक्ष ठेवले पाहिजे, बरोबर? जेव्हा मसुदा मतदार यादी तयार केली जाते तेव्हा आपण आक्षेप नोंदवले पाहिजेत. ही आमची जबाबदारी आहे. त्यावेळी आम्ही गप्प राहिलो आणि आता आम्ही बोलत आहोत, असे राजन्ना म्हणाले होते.
दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी राजन्ना यांचे आरोप फेटाळले होते. ते म्हणाले, केएन राजन्ना पूर्णपणे चुकीचे आहेत. त्यांना माहिती नाही. माझे मुख्यमंत्री आणि माझ्या पक्षाचे उच्च कमांड याचे उत्तर देतील. या वादादरम्यान के. एन. राजन्ना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
हे ही वाचा :
अमेरिकेच्या पाठिंब्यावर पाकिस्तानला खुमखुमी!
बांगलादेशमध्ये आणखी एका पत्रकारावर हल्ला
अणुहल्ल्याची धमकी देण्याची पाकची जुनी सवय, आंतरराष्ट्रीय समुदायाने अर्थ काढावा!
राहुल गांधींना सत्य पचत नाही
कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी मंत्री के. एन. राजन्ना यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले, “राहुल गांधींचं विधान हे खोटं आहे. मतदार यादीतील गोंधळ काँग्रेसच्या काळातच घडले. राजन्ना यांनी हे स्पष्टपणे सांगितलं होतं. पण राहुल गांधींना हे सत्य ऐकणं कठीण गेलं. त्यामुळे त्यांनी सिद्धरामय्यांना सांगून के. एन. राजन्नांचा राजीनामा घेतला. संविधानाची प्रत घेऊन फिरणारे, आंबेडकरांविषयी बोलणारे राहुल गांधी हे सत्य पचवू शकत नाही. राजन्नांना राजीनामा देण्यास भाग पाडणं ही चुकीची गोष्ट आहे.”
#WATCH | Bengaluru | On resignation of KN Rajanna from cabinet post, Karnataka BJP President BY Vijayendra says, "Rahul Gandhi's statement is a lie. The discrepancy in the voter list happened during Congress's tenure. Rajanna had stated this. But Rahul Gandhi found it difficult… pic.twitter.com/c8Jv9KkkvH
— ANI (@ANI) August 11, 2025







