रणजी ट्रॉफीच्या एलीट ग्रुप-डी सामन्यात जम्मू-काश्मीरने दिल्लीवर ७ गडी राखून अप्रतिम विजय मिळवला! या सामन्यात औकिब नबी दारने गोलंदाजीचा कहर करत पहिल्या डावात ५ बळी घेतले आणि त्यालाच ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरवण्यात आलं.
अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीचा पहिला डाव केवळ २११ धावांवर आटोपला. संघाने फक्त १४ धावांवरच ३ गडी गमावले होते. त्यानंतर कर्णधार आयुष बडोनी आणि आयुष दोसेजा यांनी चौथ्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी करत डाव सावरला.
बडोनीने ८२ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह ६४ धावा केल्या, तर दोसेजाने ६५ धावांची खेळी साकारली. सुमित माथुरने ५५ धावा करून नाबाद राहिला. जम्मू-काश्मीरकडून औकिब नबीने ३५ धावांत ५ विकेट घेतल्या, तर वंशराज शर्मा आणि आबिद मुश्ताक यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या.
जम्मू-काश्मीरच्या पहिल्या डावात संघाने ३१० धावा केल्या. एकवेळेस ४६ धावांवर ४ गडी गमावले होते, पण कर्णधार डोगरा आणि अब्दुल समद यांनी पाचव्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी करत संघाला स्थैर्य दिलं.
डोगराने शानदार १०६ धावा, तर समदने ८५ धावा केल्या. दिल्लीकडून सिमरजीत सिंगने ६ विकेट घेतल्या.
पहिल्या डावाच्या आधारे जम्मू-काश्मीरला ९९ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात दिल्लीची फलंदाजी पुन्हा कोसळली आणि संघ २७७ धावांवर सर्वबाद झाला.
या डावात कर्णधार बडोनीने ७२ धावा, तर दोसेजाने ६२ धावा केल्या, पण संघाला मोठं आव्हान उभं करता आलं नाही.
१७९ धावांचं लक्ष्य जम्मू-काश्मीरने फक्त ४३.३ षटकांत गाठलं. कामरान इकबालने नाबाद १३३ धावा ठोकत विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने विव्रंत शर्मासह ८२ धावांची भागीदारी केली.
सामन्यातील हिरो:
-
औकिब नबी दार — ५ विकेट
-
कामरान इकबाल — नाबाद १३३ धावा







