विराट कोहली… नाव घेताच डोळ्यांसमोर येतो तो आक्रमक आत्मविश्वास, अपार मेहनत आणि धावांचा अखंड प्रवाह. भारतीय क्रिकेटचा हा ‘रन मशीन’ २०२५ या वर्षात पुन्हा एकदा आपल्या तेजाने उजळून निघाला. चषकांपासून विक्रमांपर्यंत, वैयक्तिक कामगिरीपासून संघाच्या यशापर्यंत—हे वर्ष कोहलीसाठी खरंच बेमिसाल ठरलं.
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज विराट कोहलीसाठी २०२५ हे वर्ष खास ठरले. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयपीएल जेतेपदासह अनेक ऐतिहासिक विक्रम त्याने या वर्षी आपल्या नावावर केले. सचिन तेंडुलकरांचे विक्रम मोडत कोहलीने स्वतःचं वेगळंच स्थान निर्माण केलं.
आयपीएल ट्रॉफीचा दुष्काळ संपला
विराट कोहलीने आयपीएल कारकिर्दीत आजवर केवळ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आरसीबीने २००९, २०११ आणि २०१६ मध्ये अंतिम फेरी गाठली होती, मात्र ट्रॉफी जिंकण्यात अपयश आलं होतं.
आयपीएल २०२५ मध्ये आरसीबी चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचली आणि यावेळी इतिहास बदलला. पंजाब किंग्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात आरसीबीने ६ धावांनी विजय मिळवत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी उंचावली.
या निर्णायक सामन्यात विराट कोहलीने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. संपूर्ण हंगामात कोहलीने १५ सामने खेळत ५४.७५ सरासरीने ६५७ धावा झळकावल्या.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा दबदबा
फेब्रुवारी–मार्च दरम्यान झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने तब्बल १२ वर्षांनंतर विजेतेपद पटकावले. या यशामागे विराट कोहलीची भूमिका निर्णायक ठरली.
पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतक, तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावांची झुंजार खेळी—या दोन्ही सामन्यांत कोहलीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.
या स्पर्धेत कोहलीने ५ सामन्यांत ५४.५० सरासरीने २१८ धावा केल्या.
एका फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने १३५ धावांची अफलातून खेळी करत सचिन तेंडुलकरांचा ऐतिहासिक विक्रम मोडला.
पुढील सामन्यातही त्याने १०२ धावांचे सलग शतक झळकावत आपली सर्वोच्चता सिद्ध केली. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५३ शतके झळकावली आहेत, तर सचिन तेंडुलकरांच्या नावावर कसोटीत ५१ शतके आहेत.
सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द सीरीज’
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत कोहलीने ३ सामन्यांत १५१ सरासरीने ३०२ धावा करत ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ किताब पटकावला.
तीनही फॉरमॅट मिळून कोहलीला हा पुरस्कार २२ वेळा मिळाला असून या यादीत सचिन तेंडुलकर (२० वेळा) दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
वनडे रँकिंगमध्ये दुसरे स्थान
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नाबाद ७४ धावांची खेळी आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेतील दमदार कामगिरीमुळे विराट कोहलीने आयसीसी वनडे फलंदाज क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेत दुसरा क्रमांक मिळवला.







