भारतीय क्रिकेटचं नवं दमदार चेहरा, ऋतुराज गायकवाड याने यॉर्कशायर काउंटी टीमसोबतचा करार वैयक्तिक कारणांमुळे मागे घेतल्याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. यामुळे केवळ इंग्लंडमधील त्याचं ‘रेड बॉल स्वप्न’ भंगलेलं नाही, तर यॉर्कशायर संघाचं सगळं गणितही कोलमडलं आहे.
ऋतुराजने या हंगामात पाच सामन्यांसाठी करार केला होता, मात्र आता तो एकही सामना खेळणार नाही. यॉर्कशायरचा पहिला सामना २२ जुलैला सरेविरुद्ध आहे, आणि अगदी सामन्याच्या तोंडावर हा धक्का बसल्याने व्यवस्थापन अडचणीत सापडलं आहे.
“दुर्दैवाने ऋतुराज आता उपलब्ध नाही. त्याच्या जागी कोण येणार याचा शोध सुरू आहे. वेळ खूपच कमी आहे,” असं यॉर्कशायरचे मुख्य प्रशिक्षक एंथनी मॅक्ग्राथ यांनी सांगितलं.
गायकवाडने गेल्या महिन्यात यॉर्कशायरसोबत करार करताना,
“इंग्लंडमध्ये खेळणं हे माझं स्वप्न होतं,”
असं म्हटलं होतं. मात्र, आता त्याचं स्वप्न पुढच्या हंगामासाठी पुढे ढकलावं लागणार आहे.
काय आहे गायकवाडची स्थिती?
आयपीएल २०२५ दरम्यान चेन्नई सुपर किंग्सकडून नेतृत्व करताना त्याच्या कोपराला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो कोणताही सामना खेळलेला नाही. भारत-अ संघात निवड झाली असली तरी इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यांत तो मैदानात उतरला नाही.
‘रेड बॉल’मधील संघर्ष सुरूच
-
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सरासरी ४१.७७,
-
गेल्या हंगामात १२ डावांत ५७१ धावा,
-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ४ डावांत फक्त २० धावा
हे आकडे सांगतात की गायकवाड अजूनही रेड बॉल क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करायचं मोठं आव्हान पेलतो आहे.







