भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा हिला नोव्हेंबर २०२५ महिन्यासाठी आयसीसी महिला ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या दमदार खेळीमुळे शेफालीने हा मान पटकावला.
या पुरस्कारासाठी शेफाली वर्माने थायलंडच्या थिपत्चा पुथावोंग आणि संयुक्त अरब अमिरातीच्या ईशा ओझा यांना मागे टाकत पहिल्यांदाच ‘प्लेअर ऑफ द मंथ’ किताब जिंकला.
महिला एकदिवसीय विश्वचषकात दुखापतग्रस्त प्रतीका रावलच्या जागी शेफालीला संघात संधी देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत तिने केवळ १० धावा केल्या होत्या. मात्र अंतिम सामन्यात तिने जबरदस्त पुनरागमन करत ७८ चेंडूंत २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. हा विश्वचषक अंतिम सामन्यातील भारतीय महिला सलामीवीराचा आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर ठरला. या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला ‘सामनावीर’ पुरस्कारही मिळाला.
आयसीसीकडून सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात शेफाली म्हणाली,
“माझा पहिला आयसीसी महिला विश्वचषकाचा अनुभव माझ्या अपेक्षेप्रमाणे नव्हता, पण हा प्रवास मी कधीही कल्पना केली नसेल अशा सुंदर पद्धतीने संपला. अंतिम सामन्यात संघाच्या यशात योगदान देता आलं, याचा मला खूप आनंद आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर पहिल्यांदाच विश्वचषक जिंकत इतिहास घडवण्याचा भाग होता, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.”
ती पुढे म्हणाली,
“नोव्हेंबरसाठी ‘महिला प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून निवड होणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार मी माझ्या संघसहकाऱ्यांना, प्रशिक्षकांना, कुटुंबाला आणि या संपूर्ण प्रवासात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या प्रत्येकाला समर्पित करते. आम्ही संघ म्हणूनच जिंकतो आणि हरतो, हेच या पुरस्कारालाही लागू होतं.”
खराब फॉर्ममुळे काही काळ भारतीय संघातून बाहेर पडलेल्या शेफाली वर्माला विश्वचषकात सुवर्णसंधी मिळाली आणि तिने तिचा पुरेपूर फायदा घेत टीकाकारांना चोख उत्तर दिलं. आता शेफाली वर्मा २१ डिसेंबरपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे.







