राज्यात २०२२ मध्ये जनतेच्या मनातले सरकार आणले. तेव्हापासून त्यांनी फक्त आरोप आणि टीका केली, मात्र टीकेला कामातून उत्तर दिले. त्यामुळे जनता काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभी राहिली, घरात बसणाऱ्यांच्या नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. नाशिक जिल्ह्यातील उबाठाच्या गटाच्या चार नगरसेवकांनी शेकडो कार्यकर्त्यांनी आज (१७ जून) उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.
आज उबाठाच्या नाशिकमधील युवती सेना उपजिल्हाप्रमुख आणि नगसेविका किरण बाळा दराडे, नाशिक महापालिकेच्या महिला बाल कल्याण सभापती सीमा गोकुळ नगळ, माजी सभापती पुंडलिक अरिंगले, माजी नगरसेवक पुनजाराम गामणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आणि विकासाचं वारं घेऊन पुढे घेऊन चाललोय.
मागच्या निवडणुकीत तुमचे चिन्ह धनुष्यबाण होते आणि आताही धनुष्यबाणच मिळणार आहे. तुम्ही सर्व स्वगृही परतला आहात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरसेवकांचे स्वागत केले. धनुष्यबाण आणि शिवसेनेशी नाशिककरांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. आजच्या पक्ष प्रवेशाने नाशिकमध्ये शिवसेना आणखी मजबूत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. नाशिकमधील विकासाला चालना देऊ, असे ते म्हणाले.
हे ही वाचा :
ओडिशात समुद्रकिनारी १० जणांनी केला कॉलेज तरुणीवर बलात्कार!
या सैनिकाने एशियन गेम्समध्ये जिंकले पदक
इराणचा टॉप कमांडर अली शादमानी ठार
ते पुढे म्हणाले की, अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना राज्याला विकासाच्या दिशेनं नेण्याचे काम केले. त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या. या राज्यातील मतदारांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला. त्यामुळे ८० जागा लढवून ६० जागांवर विजय मिळवला. महायुतीने २३२ जागा जिंकून ऐतिहासिक बहुमत मिळवले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेत येत आहेत कारण दिलेला शब्द पाळणे आणि जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याचे काम शिवसेना करते, असे ते म्हणाले.
शिवसेना विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात आहे. आज शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक हे तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहेत. काम करणाऱ्या लोकांना शिवसेनेवर विश्वास वाटतो, त्यामुळे दररोज विविध पक्षाचे लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी मंत्री दादा भुसे, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना सचिव राम रेपाळे, नाशिक जिल्हाप्रमुख व उपनेते अजय बोरस्ते उपस्थित होते.







