दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंग, अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर’ चित्रपट भारतात बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट भुरळ घालत असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र हा सिनेमा अडचणींचा सामना करत आहे.
स्पाय थ्रिलर अशा मांडणीत असलेला ‘धुरंधर’ भारतात प्रेक्षकांना सिनेमा गृहात आणत असताना, त्याचा आंतरराष्ट्रीय प्रवास, विशेषतः मध्य पूर्वेतील, अडचणीत आला आहे. पाकिस्तानविरोधी संदेशावर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा चित्रपट सहा आखाती देशांमध्ये- बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि युएईमध्ये ब्लॉक करण्यात आला आहे. अहवालांनुसार, निर्मात्यांनी बॉलीवूडसाठी एक महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या आखाती देशांमधील थिएटरमध्ये रिलीज करण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वत्र मंजुरी नाकारण्यात आली.
‘धुरंधर’ चित्रपट “पाकिस्तानविरोधी चित्रपट” म्हणून ओळखला जात असल्याने असे घडेल अशी भीती होती. तरीही चित्रपटाच्या टीमने प्रयत्न केला, परंतु कोणत्याही देशाने चित्रपटाच्या थीमला मान्यता दिली नाही. म्हणूनच ‘धुरंधर’ कोणत्याही आखाती प्रदेशात प्रदर्शित झालेला नाही, अशी माहिती ‘बॉलीवूड हंगामा’ने दिली आहे.
‘धुरंधर’ हा काही पहिला सिनेमा नाही जो आखाती देशात प्रदर्शन होण्यासाठी अडचणींचा सामना करत आहे. यापूर्वी, फायटर, स्काय फोर्स, द डिप्लोमॅट, आर्टिकल ३७०, टायगर ३ आणि द काश्मीर फाइल्स सारख्या चित्रपटांना मध्य पूर्वेच्या काही भागांमध्ये अशाच निर्बंधांचा सामना करावा लागला होता. सुरुवातीला युएईमध्ये प्रदर्शित झालेला फायटर देखील एका दिवसातच मागे घेण्यात आला.
हे ही वाचा..
ब्रिस्टल संग्रहालयातून भारतीय कलाकृतींसह ६०० हून अधिक वस्तूंची चोरी
इंडिगोने उड्डाणे रद्द केल्याबद्दल जबाबदार असलेले चार जण निलंबित
माजी गृहमंत्री, काँग्रेस नेते शिवराज पाटील यांचे निधन
बेकायदेशीर कफ सिरप पुरवठा केल्याप्रकरणी २५ ठिकाणी ईडीची छापेमारी
आखाती देशांमध्ये जरी हा सिनेमा नाकारला गेला असला तरी, ‘धुरंधर’ने भारतात आपली चांगली कमाई सुरूच ठेवली आहे. या चित्रपटाने एका आठवड्यात भारतात २०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि आखाती देश वगळता परदेशात ४४.५ कोटी रुपये कमावले आहेत.
सहा वर्षे दिग्दर्शनापासून दूर राहिल्यानंतर, दिग्दर्शक आदित्य धर ‘धुरंधर’ घेऊन परतला, जो २०१९ च्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ नंतरचा त्यांचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट पाकिस्तानमधील ऑपरेशन लियारी आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या कथित सहभागाच्या संबंधित घटनांपासून प्रेरित आहे. रणवीर सिंगसह, या चित्रपटात संजय दत्त, अक्षय खन्ना, आर माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.







