पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवड्यात १ लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, रुग्णांना चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी (१६ सप्टेंबर ) दिली. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘सेवा पंधरवडा’ हा लोकसहभागातून राबविला जाणारा सामाजिक उपक्रम असून याद्वारे केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा प्रसार-प्रचार, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आत्मनिर्भरतेच्या दिशेने जनजागृती केली जाणार आहे. पक्षाचे सर्व खासदार,आमदार,मंत्री,नेते,पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या सेवा पंधरवड्यात बूथ व मंडल स्तरावर सक्रीयपणे सहभागी होऊन समाजसेवेची ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार करावा असे आवाहन चव्हाण यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, या पंधरवड्यादरम्यान राज्यभर पक्षाच्या अंतर्गत रचनेतील सर्व मंडलांमध्ये रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान अशा विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी पुण्यात दुपारी ३ वाजता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पंधरवड्याअंतर्गत मोदी सरकारच्या वेगवेगळ्या लोकोपयोगी योजनांचे लाभ देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
५० लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत विविध योजनांचे लाभ पोहोचवण्याचा संकल्प सोडण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. २१ सप्टेंबर ला युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रमुख शासकीय जिल्ह्यांत ‘मोदी विकास मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येणार आहे. देश आणि राज्याच्या विकासात अधिकाधिक लोकांचा सहभाग तसेच ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला गती देण्यासाठी मॅरेथॉनमध्ये जास्तीतजास्त लोकांनी सहभाग घ्यावा या दिशेने प्रयत्न करण्यात आल्याचे ते म्हणाले.
‘नमो नेत्र संजिवनी’ अभियानामधून १ लाखांहून अधिक मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तसेच नेत्र तपासणी करून १० लाखांपेक्षा जास्त लोकांना चष्मा वाटप करण्याचेही नियोजन केले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार चषक स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नोंदणी २० सप्टेंबर पर्यंत करण्यात येईल. २५ सप्टेंबर रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त सर्व बूथवर प्रतिमा पूजन आणि तसेच प्रबुद्ध संमेलनांतून देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
भारत ड्रग्ज तस्करीत सहभागी १६,००० परदेशी नागरिकांना हद्दपार करणार!
विश्वबंधुत्व दिनानिमित्त आयोजित कृती कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद
क्रिकेटला परवानगी, पण तीर्थयात्रेला नाही? करतारपूर कॉरिडॉरवरील निर्बंधांवरून पंजाबमध्ये गोंधळ!
‘नेपाळातील अराजकतेला जिवंत लोकशाही म्हणणे आश्चर्यकारक’
‘सेवा पंधरवडा २०२५’ दरम्यान दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, वृक्षारोपण, ‘वोकल फॉर लोकल’चा प्रचार, ‘विकसित भारत’ चित्रकला स्पर्धा आणि खादी वस्तूंची खरेदी अशा अनेक कार्यक्रमांची आखणीही करण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी सेवा पंधरवडा अभियानाचे संयोजक प्रवीण घुगे, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.







