मुंबईच्या दलाल स्ट्रीटवर उभा असलेला ऐतिहासिक फिरोज जिजीभॉय टॉवर (बीएसई टॉवर) ही इमारत भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासाची साक्षीदार आहे. आशियातील सर्वात जुन्या स्टॉक एक्सचेंजच्या या मुख्य कार्यालयातून बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदररामन राममूर्ती सर कारभार पाहतात. हे कार्यालय केवळ कॉर्पोरेट स्पेस नाही, तर एका बाजूला १५० वर्षांचा वैभवशाली वारसा आणि दुसऱ्या बाजूला अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान यांचा संगम आहे. आधुनिकता आणि अध्यात्म यांचा मेळ बसत नाही, असे ज्यांना वाटते त्यांनी एकदा सुंदररामन सर यांना भेटले पाहिजे.
कपाळावर गंध आणि डोक्यावर शिखा ठेवणारे सुंदररामन सर आपल्या संस्कृतीचा यथार्थ अभिमान बाळगतात. पाश्चिमात्य पोशाखांचे त्यांना वावडे नाही, पण विचार मात्र अस्सल भारतीय आहेत. कॉर्पोरेट कल्चरमध्ये वावरतानाही आपल्या प्रथा, परंपरा आणि संस्कार अभिमानाने मिरवता येतात, हे सुंदररामन सर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. सीईओ म्हणून अनेक जण त्यांची भेट घ्यायला येतात, तसेच बीएसईशी संबंधित विषय व समस्या त्यांच्यासमोर मांडत असतात. एखादी व्यक्ती त्यांच्याकडे काही काम किंवा समस्या घेऊन गेली, तर ते तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात. तो विषय मार्गी लावताना ते जे काही बोलतात, त्यातून विषय अगदी सोपा होतो आणि समोरच्याच्या ज्ञानातही भर पडते.
त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही हाच अनुभव येतो. ते केवळ केबिनमध्ये बसून निर्णय घेत नाहीत; ब्रोकर्स, ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांशी त्यांचा थेट संवाद असतो. बारीक-सारीक गोष्टींवर त्यांची नजर असते आणि समस्यांची त्यांना चांगली जाण आहे. निर्देशांक किती उंच जाईल याची ते फार चिंता करत नाहीत; त्यांच्या दृष्टीने गुंतवणूकदारांचा विश्वास महत्त्वाचा आहे. बाजारात दीर्घकालीन पारदर्शकता आणि सुशासनाचा पाया रचण्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांना उत्तम माहिती आहे की, याच दोन गोष्टींमुळे गुंतवणूकदारांचे खरे भले होणार आहे.
बीएससी पदवी घेतल्यानंतर त्यांनी कॉस्ट अकाउंटंट (ICWAI), CAIIB (Banking) आणि जागतिक स्तरावर प्रतिष्ठित असलेली फायनान्शियल रिस्क मॅनेजर (FRM) ही पदवी संपादन केली. त्यांच्या करिअरची इनिंग खूप मोठी आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात स्टेट बँकेतून केली. पुढे इंडियन ओव्हरसीज बँकेसारख्या आघाडीच्या बँकांसोबतही त्यांनी काम केले. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये (NSE) ते १९९५ ते २०१४ या काळात कार्यरत होते. तिथे ट्रेडिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेरिव्हेटिव्ह मार्केटच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग होता.
बीएसईमध्ये येण्यापूर्वी ते बँक ऑफ अमेरिकाच्या भारतीय ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य परिचालन अधिकारी (COO) होते. जानेवारी २०२३ मध्ये बीएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी चमत्कारिक बदल घडवून आणले. त्यांच्या नियुक्तीपूर्वी BSE चा डेरिव्हेटिव्हमधील वाटा जवळपास शून्य होता; त्यांनी सेन्सेक्स वीकली ऑप्शन ट्रेड सुरू केला. त्यांच्या नेतृत्वाखाली बीएसईच्या कारभारात जबरदस्त प्रगती झाली आणि शेअरच्या किमतीत व भागधारकांच्या संपत्तीत अभूतपूर्व वाढ झाली.
बीएसईचा महसूल आर्थिक वर्ष २०२४ मधील ₹१,२९२ कोटींवरून आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत तब्बल ₹४,८३६ कोटींवर पोहोचला. बीएसईची तांत्रिक क्षमता वाढवून ती प्रति सेकंद शेकडो कोटी ऑर्डर्स हाताळण्याइतकी वेगवान झाली आहे. सुंदररामन राममूर्ती सर यांनी बीएसईचा केवळ लौकिकच वाढवला नाही, तर या १५० वर्षे जुन्या संस्थेला नवसंजीवनी देऊन तिचे भविष्य बदलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडियाच्या धोरणाला गती देत, राममूर्ती यांच्या नेतृत्वाखाली बीएसईमध्ये रेगुलेटरी फायलिंग्ज आणि तपासणीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्रगत मॉडेल्सचा वापर केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण आणि नवीन गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर मोहिमा राबवल्या आहेत.
गुंतवणूक करण्यापूर्वी ‘म्युच्युअल फंड’ सारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर करावा, यावर त्यांचा भर आहे, जेणेकरून गुंतवणूकदारांचे नुकसान होणार नाही. भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढते आहे मध्यमवर्गीय पगारदार गुंतवणूकदार बाजारात येतो आहे अशा काळात शेअर बाजाराला विश्वासाची आणि पारदर्शकतेची भक्कम तटबंदी घालण्याचे काम सुंदररामन सर करतायत. त्या कामगिरीसाठी त्यांचे कौतुक केलेच पाहिजे.
