सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहाजणांचा मृत्यू

जत तालुक्यातील मोटेवाडीत दुर्दैवी घटना

सांगलीत मंदिराची भिंत कोसळून सहाजणांचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावावर काळाने घाला घातला. मरगुबाई देवीच्या यात्रेचा उत्साह सुरू असतानाच अचानक आलेल्या जोरदार वादळाने भीषण दुर्घटनेचे रूप घेतले. वादळी वाऱ्यांपासून बचाव करण्यासाठी मंदिर परिसरात आसरा घेतलेल्या भाविकांवर मंदिराची जुनी भिंत कोसळली आणि काही क्षणांत आनंदाचे वातावरण शोकात बदलले. या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह सहाजणांचा जागीच मृत्यू झाला, तर आठजण जखमी झाले आहेत.

मोटेवाडी येथे दरवर्षीप्रमाणे मरगुबाई देवीची यात्रा सुरू होती. यात्रेनिमित्त गावात मोठी गर्दी झाली होती. संध्याकाळच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक बदललेल्या हवामानामुळे यात्रेला आलेले अनेक भाविक मंदिर परिसरात धावले. काही नागरिक मंदिराच्या भिंतीलगत उभे राहून पावसापासून आणि वाऱ्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, याचवेळी जुन्या झालेल्या मंदिराच्या भिंतीने जोरदार वाऱ्याचा तडाखा सहन न केल्याने ती अचानक कोसळली.
हे ही वाचा:
उदयनिधी स्टालिन यांना पुन्हा सनातनविरोधाचा झटका

“शिवाजीही आमचे आणि औरंगजेबही आमचे”

बांगलादेशने पाकिस्तानला धूळ चारली

इंदिरा गांधींच्या बातमीचा तो फोटो बनावट, पण बातमी खरी!

भिंत कोसळताच परिसरात एकच आक्रोश पसरला. ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले. ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता तातडीने मदतकार्य सुरू केले. हातांनी दगड-माती बाजूला करून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळातच पोलिस, महसूल प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या भीषण दुर्घटनेत अरुण विष्णू गेजगे (१४), सोन्या लक्ष्मण गेजगे (१४) आणि कोंडीबा राऊबा गेजगे (६५) यांच्यासह एकूण सहाजणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन निष्पाप मुलांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आठ जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेनंतर संपूर्ण मोटेवाडी गाव शोकसागरात बुडाले आहे. यात्रेचा उत्साह क्षणात दुःखात बदलल्याने ग्रामस्थ हादरले आहेत. या दुर्घटनेनंतर जुन्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणांच्या बांधकामांची नियमित तपासणी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून भिंत कोसळण्यामागील नेमके कारण शोधले जात आहे.

Exit mobile version