जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी टेस्लाने सोमवारी भारतातील आपला पहिला चार्जिंग स्टेशन अधिकृतपणे सुरू केला आहे. अमेरिकन ईव्ही कंपनीने मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील वन बीकेसी या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्लाने ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले, “मुंबईच्या वन बीकेसीमध्ये टेस्लाचा सुपरचार्जर आता कार्यरत झाला आहे.”
या नवीन चार्जिंग स्टेशनमध्ये चार व्ही4 सुपरचार्जिंग स्टॉल्स (डीसी फास्ट चार्जर) आणि चार एसी डेस्टिनेशन चार्जर्स बसवण्यात आले आहेत. टेस्लाचे सुपरचार्जिंग स्टॉल्स २५० किलोवॅट पर्यंतच्या जलद चार्जिंग स्पीडची सुविधा देतात, ज्याची किंमत प्रति किलोवॅट-तास ₹२४ आहे. तर डेस्टिनेशन चार्जर ११ किलोवॅटपर्यंत चार्जिंग देतात, याची दर प्रति किलोवॅट-तास ₹१४ आहे. याआधी, जुलैच्या मध्यात, टेस्लाने मुंबईच्या बीकेसीमध्ये भारतातील पहिले शोरूम सुरू केले होते.
हेही वाचा..
‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे जागृत झाले राष्ट्रप्रेम
निमिषा प्रियाला लवकरात लवकर फाशी द्या!
अफगाण नागरिकांनी तालिबान सरकारकडे मागितली मदत
डेंग्यूमधून बरे झाल्यानंतरही जाणवतेय कमजोरी?
टेस्ला आपल्या चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्ताराअंतर्गत, सप्टेंबर अखेरपर्यंत मुंबईत आणखी तीन चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची योजना आखत आहे. ही चार्जिंग स्टेशन नवी मुंबई, ठाणे आणि लोअर परळ येथे उभारली जातील. या पावलामागचा उद्देश म्हणजे मुंबईतील प्रीमियम ग्राहकांना उत्तम सेवा देणे आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देणे. सध्या भारतात टेस्लाचा Model Y उपलब्ध आहे. याचे दोन प्रकार आहेत. लाँग रेंज रिअर-व्हील ड्राइव्ह मॉडेल, किंमत: ₹६७.८९ लाख रिअर-व्हील ड्राइव्ह मॉडेल, किंमत: ₹५९.८९ लाख
ही दोन्ही मॉडेल्स चीनमधील शांघाय गिगाफॅक्टरीतून CBU (Completely Built Unit) स्वरूपात आयात केली जात आहेत. २०२५ च्या तिसऱ्या किंवा चौथ्या तिमाहीपासून डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे. बीकेसी शोरूमच्या जवळच एक सर्व्हिस सेंटर स्थापन करण्यासाठी, टेस्ला इंडिया मोटर अॅण्ड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईच्या कुर्ला पश्चिम भागात २४,५०० चौरस फुटांची जागा भाड्याने घेतली आहे.







