जंतरमंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनादरम्यान दगडांनी भरलेला ट्रक मुद्दाम उभा करून आंदोलन हिंसक दाखवण्याचा कट रचल्याचा सोशल मीडियावरील दावा दिल्ली पोलिसांनी फेटाळून लावला आहे. हा दावा पूर्णपणे निराधार आणि दिशाभूल करणारा असल्याचे सांगत पोलिसांनी अशा पोस्ट हटविण्यासाठी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटिसा पाठवल्या आहेत.
आंदोलनाचे प्रमुख अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर जंतरमंतर परिसरात दगडांनी भरलेला ट्रक उभा करण्यात आल्याचा आरोप केला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी तपासानंतर स्पष्ट केले की संबंधित ट्रक हा दिल्ली महापालिकेच्या (MCD) रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी वापरला जाणारा वाहन असून तो नियोजित कामासाठी तेथे उभा होता. आंदोलनाशी किंवा कोणत्याही कथित कटाशी त्याचा संबंध आढळून आलेला नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रकबाबतचे फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर चुकीच्या संदर्भात व्हायरल करण्यात आले. या माध्यमातून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा भ्रामक पोस्ट हटविण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना सूचना देण्यात आल्या असून संबंधित खात्यांवरही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर प्रसारित होणारी कोणतीही माहिती पडताळणी न करता पुढे पाठवू नये, तसेच अधिकृत स्रोतांकडूनच माहितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
हे ही वाचा:
वडाळा हादरवणारा ‘चुहा’ पिंजऱ्यात!
प्रियांका वड्रा-शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यात जुंपली
NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!
याव्यतिरिक्त, दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि एक्स (X) यांना नोटीस बजावली असून, सीजेपी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराशी संबंधित खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा कथितपणे प्रसार करणाऱ्या पोस्ट आणि व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले आहे. काही सोशल मीडिया-आधारित न्यूज पोर्टल्ससह अनेक खात्यांवरून, कथित डीपफेक व्हिडिओ आणि आंदोलने व त्यानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दलची दिशाभूल करणारी माहिती असलेल्या हजारो पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आल्या होत्या. दिशाभूल करणाऱ्या पोस्ट्सबद्दल वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींनंतर, IFSO युनिटने प्लॅटफॉर्म्सना अशा सामग्रीवर कारवाई करण्यास सांगितले आहे.
