एकाच वेळी तीन स्वदेशी युद्धनौका नौदलात दाखल होणार; काय आहेत वैशिष्ट्ये?

२१ जूनला भारतीय नौदलाला मिळणार मोठी भेट

एकाच वेळी तीन स्वदेशी युद्धनौका नौदलात दाखल होणार; काय आहेत वैशिष्ट्ये?

भारतीय नौदलाच्या सागरी सामर्थ्यात आणखी मोठी भर पडणार आहे. २१ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन अत्याधुनिक स्वदेशी युद्धनौकांचा भारतीय नौदलात औपचारिक समावेश केला जाणार आहे. त्यामुळे हा दिवस भारतीय नौदलाच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट येथे आयोजित विशेष समारंभात या तिन्ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात सामील केल्या जातील. यामध्ये गाइडेड मिसाइल फ्रिगेट ‘दूनागिरी’, अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट ‘अग्रेह’ आणि लार्ज सर्व्हे व्हेसल ‘संशोधक’ यांचा समावेश आहे. यापूर्वी १५ जानेवारी २०२५ रोजी मुंबईत पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत INS निलगिरी, INS सुरत आणि INS वाघशीर यांचा एकाच दिवशी नौदलात समावेश करण्यात आला होता.

‘दूनागिरी’मुळे वाढणार नौदलाची मारक क्षमता

यावर्षी ३० मार्च रोजी Garden Reach Shipbuilders & Engineers (GRSE) ने प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधलेले पाचवे गाइडेड स्टेल्थ फ्रिगेट ‘दूनागिरी’ भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले होते. ‘दूनागिरी’ हे पूर्वीच्या INS द्रोणागिरीचे आधुनिक स्वरूप असून ते लींडर वर्गातील फ्रिगेटच्या वारशाला पुढे नेणारे जहाज आहे. १९७७ ते २०१० या कालावधीत जुनी दूनागिरी नौदलाच्या सेवेत होती.

प्रोजेक्ट 17A अंतर्गत एकूण सात नीलगिरी वर्गातील फ्रिगेट्स तयार करण्यात येत आहेत. यापैकी INS निलगिरी, हिमगिरी, उदयगिरी आणि तारागिरी यापूर्वी नौदलात दाखल झाले आहेत. आता दूनागिरीची भर पडणार आहे.

या युद्धनौकेत खालील अत्याधुनिक शस्त्रसज्जता आहे:

सुमारे ६,७०० टन वजनाची ही युद्धनौका ३० नॉट्स वेगाने धावू शकते. जहाजातील जवळपास ७५ टक्के उपकरणे स्वदेशी आहेत.

‘अग्रेह’ करणार पाणबुड्यांचा शोध

शत्रूच्या पाणबुड्यांचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी भारतीय नौदलाने अँटी-सबमरीन वॉरफेअर (ASW) शॅलो वॉटर क्राफ्ट प्रकल्प सुरू केला होता. २०१९ मध्ये अशा १६ युद्धनौकांच्या बांधकामाचा करार करण्यात आला होता. त्यापैकी ‘अग्रेह’ आता नौदलात दाखल होत आहे. याआधी INS Arnala, INS Andrott, INS Mahe आणि INS Anjadip या नौका सेवेत दाखल झाल्या आहेत.

‘अग्रेह’ची वैशिष्ट्ये:

ही नौका २५ नॉट्स वेगाने धावू शकते आणि सुमारे ३,३०० किलोमीटर अंतर पार करू शकते. किनारपट्टी भागात १०० ते १५० नॉटिकल मैलांपर्यंत शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेण्याची क्षमता तिच्यात आहे.

‘संशोधक’ करणार समुद्रतळाचा अभ्यास

समुद्रातील सुरक्षित नौकानयनासाठी अचूक हायड्रोग्राफिक सर्व्हे आणि समुद्री नकाशे तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी भारतीय नौदलाने आधुनिक सर्व्हे जहाजांच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पाअंतर्गत INS Sandhayak, INS Nirdeshak आणि INS Ikshak यांचा आधीच नौदलात समावेश झाला आहे. आता चौथे आणि अंतिम लार्ज सर्व्हे व्हेसल ‘संशोधक’ सेवेत दाखल होणार आहे.

समुद्राच्या पृष्ठभागाखाली अनेक अदृश्य धोके दडलेले असतात. समुद्राची खोली बदलणे, त्सुनामी किंवा इतर नैसर्गिक घटनांमुळे समुद्रतळात होणारे बदल यांची माहिती गोळा करून सुरक्षित नौकानयनासाठी आवश्यक समुद्री नकाशे तयार करण्याचे महत्त्वाचे काम ‘संशोधक’ करणार आहे.

‘संशोधक’ची प्रमुख वैशिष्ट्ये

‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने आणखी एक पाऊल

या तीन स्वदेशी युद्धनौकांच्या समावेशामुळे भारतीय नौदलाची समुद्री सुरक्षा, पाणबुडीविरोधी क्षमता, सागरी सर्वेक्षण आणि युद्धसज्जता अधिक मजबूत होणार आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेलाही मोठे बळ मिळणार आहे. २१ जूनचा दिवस भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या वाटचालीतील आणखी एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.

Exit mobile version