स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात विद्यार्थ्यांसोबत तिरंगा रॅली काढली. देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासोबतच विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा संघर्ष, त्यासाठी झालेले बलिदान आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानाची जाणीव करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
सीआरपीएफचे सहाय्यक कमांडंट प्रह्लाद सिंह यांनी सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली होती. त्याच अभियानाचा संदेश पुढे नेत दरवर्षी १५ ऑगस्टच्या निमित्ताने तिरंगा रॅली आयोजित केली जाते. या रॅलीमध्ये जवळच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. “ही मुलेच जम्मू-काश्मीर आणि देशाचे भविष्य आहेत. भारताची संस्कृती, परंपरा आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झालेला संघर्ष त्यांना समजणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही, त्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे त्याचा सन्मान करणे आणि हा इतिहास लक्षात ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे सिंह यांनी सांगितले.
हे ही वाचा:
स्वातंत्र्यदिनासाठी दिल्लीत हाय अलर्ट, १९ दहशतावाद्यांचे पोस्टर्स जारी
इराणच्या धमकीने ट्रम्प सतर्क; केटरिंग ट्रक ठरला ‘सीक्रेट एस्केप प्लॅन’
धारावीत आई-वडिलांनीच दीड वर्षांच्या बाळाला १ लाख ५ हजारांत विकले!
ब्लिंकइटच्या गोदामात झुरळेच झुरळे; परवाना रद्द
रॅलीत सहभागी विद्यार्थी आदित्य राज सिंह याने ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या इतिहासाची माहिती प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक असून, तिरंग्याचे महत्त्व आणि देशाबद्दल अभिमानाची भावना प्रत्येकामध्ये असली पाहिजे, असे त्याने सांगितले. दरम्यान, टिंडेल बिस्को स्कूलमधील नववीचा विद्यार्थी नील यानेही विद्यार्थ्यांनी अशा रॅली आणि देशभक्तीपर कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे म्हटले. देशाचा गौरव वाढवण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्याने सांगितले. नील याने या रॅलीत दुसऱ्यांदा सहभाग घेतला. गेल्या वर्षीही आपण या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. दोन्ही वेळचा अनुभव अभिमानास्पद असून, देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले.
