नोएडातील सुपरटेक ट्विन टॉवर्सचे नियंत्रित पद्धतीने पाडकाम करणारी एडिफाइस इंजिनिअरिंग कंपनी आता बेंगळुरूमधील एसएनएन राज एटर्निया या प्रकल्पातील १८ मजली निवासी टॉवर पाडण्याचे काम करणार आहे. टॉवर एका बाजुला कलल्याचे आढळल्यानंतर विकासकाने तो स्वेच्छेने पाडून नव्याने उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
पुनर्बांधणीच्या कालावधीत प्रभावित ४९ घरखरेदीदारांना त्यांच्या ईएमआय आणि घरभाड्याचा खर्च भागवण्यासाठी आर्थिक भरपाई दिली जाणार असून, ही रक्कम संबंधित फ्लॅटच्या आकारानुसार निश्चित केली जाईल, अशी माहिती एसएनएन राज कॉर्पचे ऑपरेशन्स संचालक अनुज संजय जैन यांनी दिली.
पाडकामाला सहा महिने, पुनर्बांधणीला १८ महिने
अनुज जैन म्हणाले, “टॉवर पाडण्यास सुमारे पाच ते सहा महिने लागतील, तर पुनर्बांधणीचे काम सुमारे 18 महिन्यांत पूर्ण होईल. संपूर्ण प्रकल्पावर सुमारे २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो कंपनी स्वतः उचलणार आहे. ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.”
टॉवर पाडण्यासाठी डायमंड वायर रोप कटिंग या नियंत्रित तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीमुळे कंपन कमी होतात आणि शेजारील इमारतींची सुरक्षितता अबाधित राहते.
हे ही वाचा:
अंमली पदार्थ आता ‘कुरियर’ करण्याचा घाट, न्यूझीलंडला जाणारे ड्रग्स पकडले
रशिया-युक्रेन संघर्ष पुन्हा भडकला
भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा!
४९ प्रीमियम फ्लॅट प्रभावित
बेंगळुरूच्या दक्षिण भागातील होसूर रोडजवळील कुड्लू परिसरात असलेल्या एसएनएन राज एटर्निया या निवासी प्रकल्पामध्ये एकूण ९७२ फ्लॅट्स असून ते सुमारे १५ टॉवर्समध्ये विभागलेले आहेत.
यापैकी E-3 ब्लॉकमधील १८ मजली टॉवरमध्ये ४९ प्रीमियम फ्लॅट्स आहेत. या सर्व फ्लॅट्सची विक्री झाली असून ताबा देण्याची तयारी सुरू होती. मात्र, टॉवर कलल्याचे आढळल्यानंतर विकासकाने तो पाडून पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला.
९७२ पैकी ८२२ फ्लॅट्सचा ताबा ग्राहकांना देण्यात आला आहे, तर उर्वरित १५० फ्लॅट्सपैकी ४९ फ्लॅट्स या प्रभावित टॉवरमध्ये आहेत. प्रत्येक फ्लॅटची सरासरी किंमत सुमारे १.५ कोटी रुपये आहे.
जैन यांनी सांगितले की, “इतर सर्व टॉवर्सची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये कोणतीही समस्या आढळलेली नाही. केवळ या एका ब्लॉकमध्येच अडचण आहे. दोन बोरहोलमधील चुकीच्या मातीच्या माहितीमुळे ही समस्या निर्माण झाली.”
कंपनीने या संपूर्ण प्रकरणाची माहिती कर्नाटक रेरा प्राधिकरणालाही दिली आहे.
ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार नाही
पुनर्बांधणीचा संपूर्ण खर्च कंपनी उचलणार असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले. “ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. पुनर्बांधणीसाठी आवश्यक नियोजन कंपनीने आधीच केले असून ग्राहकांनाही त्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी आमच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.”
याशिवाय पुनर्बांधणीच्या कालावधीत प्रत्येक घरखरेदीदाराला ईएमआय आणि घरभाड्याच्या खर्चासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
समस्या कशी उघडकीस आली?
टॉवरला सर्व मंजुरी मिळाल्यानंतर आणि ऑक्युपन्सी सर्टिफिकेट (OC) प्राप्त झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता तपासणीदरम्यान ही समस्या समोर आली. अनुज जैन म्हणाले, “ग्राहकांना फ्लॅट दाखवण्याचे काम सुरू असताना आमच्या टीमला ड्राइव्हवेवर काही असामान्य उतार-चढाव दिसले. काही ठिकाणी उताराची दिशा बदलल्याचे लक्षात आले. त्यानंतर आम्ही तातडीने स्ट्रक्चरल अभियंत्यांना बोलावले.”
त्यानंतर नव्याने करण्यात आलेल्या भू-तांत्रिक तपासणीत मूळ मातीच्या अहवालामध्ये गंभीर त्रुटी असल्याचे उघड झाले. त्यांनी सांगितले की, “नवीन तपासणीत जुन्या मातीच्या अहवालाशी पूर्ण विसंगती आढळली.”
टॉवर कलल्याचे डोळ्यांना दिसत नाही
जैन यांच्या मते, टॉवर कलल्याचे सामान्यपणे दिसत नाही. “सुमारे ६० मीटर उंच इमारतीमध्ये २०० मिलीमीटरचे विचलन झाले आहे. हे फक्त विशेष मोजमाप उपकरणांद्वारेच लक्षात येऊ शकते. तज्ज्ञांनी मायक्रो-पायलिंग करून इमारत स्थिर करण्याचा पर्याय सुचवला होता. मात्र, भविष्यात १० ते १५ वर्षांनी पुन्हा संरचनात्मक अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कंपनीने तो पर्याय नाकारला.
“ग्राहकांवर भविष्यातील धोका टाकण्यास आम्ही तयार नव्हतो. म्हणूनच टॉवर पूर्णपणे पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला,” असे जैन यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांचा कंपनीच्या निर्णयाला पाठिंबा
प्रभावित घरखरेदीदार अशोक पटेल यांनी सांगितले की, सुरुवातीला धक्का बसला होता. मात्र, कंपनीने परिस्थिती स्पष्ट केल्यानंतर दिलासा मिळाला. “आम्ही फ्लॅटची पाहणी केली होती आणि कोणताही दोष आढळला नव्हता. मात्र, समस्या लक्षात आल्यानंतर कंपनीने ताबा न देण्याचा निर्णय घेतला. आता कंपनी जबाबदारीने हे प्रकरण हाताळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
इतर पाडकामांपेक्षा वेगळे प्रकरण
देशातील इतर मोठ्या निवासी इमारतींच्या पाडकामांपेक्षा हे प्रकरण वेगळे आहे.
नोएडातील सुपरटेक ट्विन टॉवर्स न्यायालयाच्या आदेशानंतर बांधकाम नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे पाडण्यात आले होते. केरळमधील मराडू अपार्टमेंट्स किनारपट्टी नियमन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पाडण्यात आले. गुरुग्राममधील चिंटेल्स पॅराडिसोमध्ये संरचनात्मक बिघाडामुळे काही टॉवर्स असुरक्षित घोषित करण्यात आले होते.
मात्र, SNN राज एटर्निया प्रकरणात कोणत्याही न्यायालयीन आदेशाशिवाय, ग्राहकांना ताबा देण्यापूर्वीच भू-तांत्रिक त्रुटी लक्षात आल्यानंतर विकासकाने स्वेच्छेने संपूर्ण टॉवर पाडून नव्याने उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
