सन २०२५ हे वनडे क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. विश्वचषकानंतर सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी चॅम्पियन्स ट्रॉफी याच वर्षी पार पडली आणि भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत विजेतेपद पटकावले. भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी वनडेत दमदार कामगिरी केली असली, तरी जागतिक पातळीवरील २०२५ मधील टॉप ५ वनडे फलंदाजांच्या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही, हे विशेष लक्षवेधी ठरले आहे.
या यादीतील पहिले नाव अनेक क्रिकेटप्रेमींना आश्चर्यचकित करणारे आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट याने मागील काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची छाप सोडली आहे. मात्र २०२५ मध्ये त्याने वनडे फॉर्मेटमध्येही वर्चस्व गाजवले. रूटने १५ सामन्यांच्या १५ डावांत ३ शतके आणि ४ अर्धशतके झळकावत ८०८ धावा केल्या. २०२५ मधील वनडेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणे हे रूट केवळ कसोटीचाच नव्हे, तर सर्व फॉरमॅटमधील दर्जेदार फलंदाज असल्याचे सिद्ध करते.
न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १७ सामन्यांच्या १६ डावांत १ शतक आणि ६ अर्धशतके करत ७६१ धावा केल्या.
तिसऱ्या क्रमांकावर स्कॉटलंडचा जॉर्ज मन्सी आहे. मन्सीने ११ सामन्यांत २ शतके आणि ५ अर्धशतके झळकावत ७३५ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेचा मॅथ्यू ब्रिट्झके चौथ्या क्रमांकावर असून, त्याने १२ सामन्यांच्या १२ डावांत १ शतक आणि ६ अर्धशतके करत ७०६ धावा जमवल्या.
पाचव्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप आहे. होपने १५ सामन्यांच्या १५ डावांत २ शतके आणि ४ अर्धशतके झळकावत ६७० धावा केल्या.







