भारताविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ट्रॅव्हिस हेडने केवळ २९ धावांची खेळी करत इतिहास रचला आहे. हेड हा सर्वात कमी डावांत ३ हजार वनडे धावा करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे.
हेडने हा टप्पा फक्त ७६ डावांत पार केला. त्याआधी स्टीव्ह स्मिथने ७९ डावांत, तर मायकेल बेवन आणि जॉर्ज बेली यांनी ८० डावांत ही कामगिरी केली होती. डेव्हिड वॉर्नरने ८१ डावांत ३ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
जगभरातील खेळाडूंमध्ये सर्वात कमी चेंडूत ३ हजार वनडे धावा करणाऱ्यांच्या यादीत ट्रॅव्हिस हेड चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल स्थानी ग्लेन मॅक्सवेल आहे, ज्याने फक्त २,४४० चेंडूंमध्ये ३ हजार धावा केल्या. त्यानंतर जोस बटलर (२,५३३ चेंडू), जेसन रॉय (२,८२० चेंडू) आणि चौथ्या क्रमांकावर हेड (२,८३९ चेंडू) आहे. जॉनी बेअरस्टोने २,८४२ चेंडूंमध्ये हा टप्पा गाठला.
सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हेड व मिचेल मार्श या सलामी जोडीने संघाला दमदार सुरुवात दिली. दोघांनी ९.२ षटकांत ६१ धावांची भागीदारी केली.
हेडने २५ चेंडूंमध्ये ६ चौकारांसह २९ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार मिचेल मार्शने ५० चेंडूंमध्ये ४१ धावा करत खेळ सावरला, पण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला.
यानंतर मॅथ्यू शॉर्ट आणि मॅट रॅनेशॉ यांनी ३६ धावांची भागीदारी करत डाव उभा करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट ३० धावा करून माघारी परतला. ४१ षटकांपर्यंत ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ७ विकेट्सवर २०७ धावा इतका झाला होता.
