दहिसर (पूर्व) येथील केतकी पाडा परिसरात असलेल्या शेख खाणीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी घडली. ही खाण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येत असून, या दुर्घटनेत १९ वर्षीय दोन तरुणांना जीव गमवावा लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १०:२६ च्या सुमारास दहिसरच्या केतकी पाडा येथील शेख खाणीत दोन मुले पडल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या (MFB) नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
खाण १० ते १५ फूट खोल असल्याने जवानांनी तातडीने शोधमोहीम राबवून दोन्ही तरुणांना बाहेर काढले आणि उपचारासाठी तातडीने कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलवले.
हे ही वाचा:
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; १५ जणांचा मृत्यू
“काश्मीरमध्ये आमचेच दहशतवादी लढले आणि…”, हिजबुल कमांडरच्या कबुलीने पाकची नाचक्की
एकेकाळी ‘नकोशी’ असणारी वाघीण बनली गिरडच्या जंगलाची ‘राणी’
भारतीय नौदलाला नवे बळ! अत्याधुनिक ‘आयएनएस महेंद्रगिरी’ ताफ्यात
शताब्दी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आणण्यापूर्वीच दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता. मृतांची ओळख पियूष गुप्ता (वय १९) आणि ओम अंकुश सिंग (वय १९) अशी पटली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेबाबत स्थानिक पोलीस अधिक तपास करत असून, नेमके हे तरुण खाणीत कसे पडले, याचा शोध घेतला जात आहे.
