ठाण्यातील नौपाडा परिसरातून अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. नौपाड्यातील शिवानंद इमारतीमध्ये असलेल्या एका प्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आउटलेटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छापा टाकत मोठी कारवाई केली. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली.
या आउटलेटमध्ये मोठ्या प्रमाणावर सडलेले दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड आणि इतर खाद्यपदार्थ साठवून ठेवण्यात आले होते. या सडलेल्या अन्नामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड तीव्र दुर्गंधी पसरली होती. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता, रहिवाशांनी या अस्वच्छतेबाबत तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असह्य दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी भाजप नगरसेवक संजय वाघुले यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर तक्रारीची दखल घेत नगरसेवक संजय वाघुले आणि शिवसेनेचे पदाधिकारी किरण नाकती यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
आउटलेटमधील अत्यंत घाणेरडी आणि अस्वच्छ परिस्थिती पाहिल्यानंतर, त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे संपर्क साधून या बेजबाबदार दुकानदारावर तातडीने कठोर कारवाई करण्याची आक्रमक मागणी केली. लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर एफडीएची यंत्रणा तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आली. अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) अधिकाऱ्यांनी या शिवानंद इमारतीमधील आउटलेटवर थेट छापा टाकला. या तपासणीदरम्यान अन्नपदार्थांच्या साठवणुकीत आणि स्वच्छतेच्या बाबतीत धक्कादायक त्रुटी आढळून आल्या आहेत. मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेले दुग्धजन्य पदार्थ आणि ब्रेड सडलेल्या अवस्थेत साठवून ठेवल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं.
हे ही वाचा:
दहिसरच्या खाणीत बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी अंत
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; १५ जणांचा मृत्यू
“काश्मीरमध्ये आमचेच दहशतवादी लढले आणि…”, हिजबुल कमांडरच्या कबुलीने पाकची नाचक्की
एकेकाळी ‘नकोशी’ असणारी वाघीण बनली गिरडच्या जंगलाची ‘राणी’
हे सर्व सडलेले खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले असून, नागरिकांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेता संबंधित आउटलेट सील करण्याची कायदेशीर प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर कोणतीही गय न करता कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. या धडक कारवाईमुळे नौपाड्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला असून समाधान व्यक्त केले आहे.
