महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या लिअरजेट ४५ अपघाताच्या प्राथमिक अहवालात कमी दृश्यमानता आणि अनियंत्रित विमानतळावरील सुरक्षेतील त्रुटी यावर गंभीर लक्ष वेधण्यात आले आहे. या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य चार जणांचा मृत्यू झाला.
एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) च्या प्राथमिक अहवालानुसार, लँडिंगच्या वेळी दृश्यमानता केवळ ३ किमी होती, जी व्हीएफआरसाठी आवश्यक किमान ५ किमीपेक्षा खूपच कमी होती. अपघात २८ जानेवारी रोजी सकाळी सुमारे पावणेनऊ वाजता झाला.
मुंबईहून बारामतीकडे येणारे VT-SSK नोंदणी क्रमांकाचे लिअरजेट ४५ हे व्हीएसआर व्हेन्चर्स प्रा. लि. संचलित खासगी व्हीआयपी चार्टर विमान होते. या अपघातात विमानातील सर्व पाच जण – पायलट, फर्स्ट ऑफिसर, केबिन अटेंडंट आणि दोन प्रवासी – मृत्युमुखी पडले.
अहवालात म्हटल्याप्रमाणे लँडिंगदरम्यान काय घडले?
सकाळी ८.१९ वाजता विमानाने बारामती टॉवरशी संपर्क साधला.
८.३१ वाजता दृश्यमानता ३ किमी असल्याची माहिती देण्यात आली.
पहिला लँडिंग प्रयत्न रद्द करण्यात आला.
दुसऱ्या प्रयत्नात८:४३.५५ वाजता धावपट्टी दिसते आहे, असा संदेश देण्यात आला.
८:४४.१३ वाजता कॉकपिटमधून ओह शिट असा आवाज नोंदवला गेला.
विमान धावपट्टी क्रमांक ११ च्या डाव्या बाजूला सुमारे ५० मीटर अंतरावर कोसळले. प्रथम झाडांना धडक देऊन नंतर जमिनीवर आदळले आणि त्यानंतर आग लागली.
व्हीएफआर साठी आवश्यक किमान दृश्यमानतेपेक्षा कमी
अहवालात नमूद केले आहे की, बारामती विमानतळावर नियंत्रित हवामान केंद्र नाही. दृश्यमानता तात्पुरत्या साधनांच्या आधारे मोजली जाते. अपघाताच्या दिवशी दृश्यमानता ३ किमी होती, जी आवश्यक ५ किमीपेक्षा कमी होती.
पुणे येथील वेधशाळेच्या माहितीनुसार सकाळी ८.१० ते ८.३० दरम्यान दृश्यमानता २००० मीटरपर्यंत घसरली होती.
बारामती विमानतळावरील सुरक्षा त्रुटी
हे अनियंत्रित विमानतळ असून केवळ वाऱ्याची दिशा दर्शविणारे विन्डसॉक उपलब्ध आहेत.
रनवे ११ च्या बाजूस विन्डसॉक नव्हता.
धावपट्टीवरील चिन्हे फिकट झाली होती.
२०१६ नंतर धावपट्टीच्या पृष्ठभागाची डागडुजी झालेली नव्हती.
धावपट्टीच्या जवळ बचाव यंत्रणा तसेच अग्निशमन यंत्रणा युनिट उपलब्ध नव्हते.
विमानतळाभोवती पूर्ण कुंपण नव्हते.
धावपट्टीचे एक टोक ‘टेबलटॉप’ प्रकारचा आहे.
हे ही वाचा:
इराणने होर्मुज सामुद्रधुनी रोखली
अमेरिका – इस्रायलच्या हल्ल्यात खामेनेई यांच्या मृत्यूची इराणकडून पुष्टी
“समलैंगिक व्यक्तीला राज्यसभेत पाठवणे इस्लामविरोधी; तृणमूलने प्रोत्साहन देऊ नये”
केरळ स्टोरी २ ने केली शनिवारी भरगच्च कमाई
वैमानिक आणि विमान
६१ वर्षीय पायलट कपूर यांच्याकडे १८,८५५ तासांचा उड्डाण अनुभव होता.
२५ वर्षीय फर्स्ट ऑफिसरकडे २४०० तासांचा अनुभव होता.
दोघेही पूर्वी बारामतीसारख्या अनियंत्रित विमानतळांवर उड्डाणाचा अनुभव असलेले होते.
ब्रिथ ऍनालायझर चाचण्या निगेटिव्ह आढळल्या. मृत्यूचे कारण “जखमा व भाजल्यामुळे मृत्यू” असे नमूद करण्यात आले.
फ्लाइट रेकॉर्डर तपास
फ्लाइट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आगीत नुकसानग्रस्त झाला असून डेटा पुनर्प्राप्तीसाठी अमेरिकेची मदत मागण्यात आली आहे.
AAIB ने स्पष्ट केले आहे की हा प्राथमिक अहवाल असून अंतिम निष्कर्ष अद्याप बाकी आहेत.
अंतरिम सुरक्षा शिफारसी
AAIB ने DGCA ला खालील शिफारसी केल्या आहेत:
व्हीएफआर नियमांचे कठोर पालन
हवामान निकष पूर्ण झाल्याशिवाय उड्डाणास परवानगी नाही
लँडिंग सहाय्यक साधनांमध्ये सुधारणा
अशा विमानतळांना परवाना देण्याची शक्यता तपासणे
तपास अद्याप सुरू असून अपघाताची मूळ कारणे आणि योगदान देणारे घटक शोधले जात आहेत.







