हार्दिक पांड्याचा राजकोटमध्ये वादळी शतक

हार्दिक पांड्याचा राजकोटमध्ये वादळी शतक

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ निवडीआधीच Hardik Pandya याने Vijay Hazare Trophy स्पर्धेत जबरदस्त फटकेबाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजकोटमध्ये झालेल्या सामन्यात हार्दिकने सलग पाच षटकार आणि एक चौकार लगावत वादळी शतक साकारले.

Niranjan Shah Stadium, खंडेरी येथे बडोद्याकडून खेळताना हार्दिकने विदर्भविरुद्ध स्फोटक शतक झळकावले. त्याने सुरुवात संयमी केली होती. ४४ चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले. मात्र अर्धशतकानंतर त्याचा रनरेट झपाट्याने वाढला आणि मैदानात अक्षरशः वादळ निर्माण झाले.

डावाच्या ३९व्या षटकात हार्दिकचा रौद्रावतार पाहायला मिळाला. त्या वेळी ६२ चेंडूंमध्ये ६६ धावा करत खेळत असलेल्या हार्दिकसमोर डावखुरा फिरकी गोलंदाज पार्थ रेखडे गोलंदाजीस आला. हार्दिकने त्या षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर सलग पाच षटकार ठोकले, तर शेवटच्या चेंडूवर चौकार मारत अवघ्या सहा चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.

हार्दिक अखेर ९२ चेंडूंमध्ये ११ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने १३३ धावा करून बाद झाला. त्याच्या या शतकी खेळीमुळे नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बडोद्याने ९ बाद २९३ धावांपर्यंत मजल मारली. हार्दिकव्यतिरिक्त इतर फलंदाजांकडून मोठी खेळी झाली नाही. विष्णू सोलंकीने २६, कर्णधार क्रुणाल पांड्याने २३, तर अतित सेठने २१ धावा केल्या.

विदर्भकडून यश ठाकूर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांत ६४ धावा देत ४ बळी घेतले, ज्यात हार्दिकचा बळीही समाविष्ट होता. नचिकेत भूटे आणि पार्थ रेखडे यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. मात्र हार्दिकच्या एका षटकातील धडाकेबाज फटकेबाजीमुळे पार्थला १० षटकांत ८० धावा द्याव्या लागल्या. प्रफुल हिंगेने १ बळी घेतला.

Exit mobile version